‘पाणी बचती’च्या शपथा गेल्या वाहून
By Admin | Published: August 10, 2016 01:38 AM2016-08-10T01:38:30+5:302016-08-10T01:38:30+5:30
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची
अंथुर्णे : दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र यंदा धरणक्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे नीरा डावा कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले आहे.
कालव्याचे पाणी ओढे, नाल्यांमध्ये पाझरून येत आहे. टंचाईच्या दिवसांमध्ये गावागावांत घेतलेल्या ‘पाणी बचती’च्या शपथा केव्हाच वाया जाणाऱ्या पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. हे पाणी साठवण्यासाठी व जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता. अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामस्थांसह मुक्या जनावरांचे पाण्यासाठी अतोनात हाल झाले. परिस्थिती बदलली. इंदापूर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात तर तालुक्याबाहेर जास्त प्रमाणावर पाऊस पडल्याचा या परिसराला फायदा झाला.
पाणीटंचाई कमी झाली. पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे जनावरांना गवत उपलब्ध झाले. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रशासन वाया जाणाऱ्या पाण्याबाबत उदासीन झाले आहे. परिणामी ओढे-नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. पाण्याचे महत्त्व तुर्तास तरी कुणास पटत नसल्याचेच या दिसून येत आहे.
एप्रिल मे महिन्यात तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असतो, पाणी मिळविण्याकरिता अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. मोठ्या प्रमाणवर पैशाचा अपव्यव केला जातो. प्रसंगी पैसे देऊनही वेळेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्या वेळी मात्र पाण्यासाठी दाही दिशा होते. (वार्ताहर)