दुसरे कॅनव्हासचे शुज घातल्याने 'दस्तुर स्कुल'ने मुलांना पाठविले घरी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:09 AM2022-02-15T11:09:31+5:302022-02-15T11:10:17+5:30
विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवरच अडविण्यात आले होते...
पुणे : शाळेने नेमून दिलेले शुज न मिळाल्याने दुसरे कॅनव्हासचे शुज घालून गेलेल्या ११ वीतील २० ते २५ मुला-मुलींना दस्तुर स्कुलने आज सकाळी शाळेत घेतले नाही. त्यांना काही वेळ दरवाजा बाहेर थांबविले व त्यानंतर शाळेत न घेता घरी पाठवून दिले. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत.
कोरोना संसर्गामुळे आधीच अनेक महिने शाळा बंद होत्या. त्यात आता शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. असे असताना पालकांनी साडेसहा हजार रुपये खर्च करुन नवीन गणवेश घेतला. पण शाळेने नेमून दिलेल्या दुकानातच बुट नाही. त्यामुळे अनेक पालक ते खरेदी करु शकले नाहीत. अकरावीत शिक्षण घेणारे काही विद्यार्थी दुसरे कॅनव्हासचे बुट घालून शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांना शाळेच्या गेटवरच अडविण्यात आले. शाळेने नेमून दिलेले बुट न घातल्याने त्यांना शाळेत न घेता घरी पाठवून देण्यात आले आहे.
या प्रकाराने पालक संतापले असून साडेसहा हजार रुपयांचा गणवेश आम्ही घेऊ शकलो असताना ५०० रुपयांचा बुट घेणार नाही का. पण शाळेने नेमून दिलेल्या दुकानातच बुट नसल्याने मुले बुट घालून जाऊ शकली नाही. आता शाळा किती दिवस चालणार हे निश्चित नसताना व शिक्षणाला महत्व देण्याऐवजी शाळा केवळ या वस्तूतून मिळणाऱ्या कमिशनपायी मुलांना वर्गात बसू देत नाही़ त्यांनी मुलांच्या शिक्षणाला महत्व देण्याची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़ याबाबत दस्तुर स्कुलशी संपर्क होऊ शकला नाही.