Weather Alert : पुढील तीन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:16 PM2021-05-29T22:16:49+5:302021-05-29T22:18:27+5:30
गेले काही दिवस दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असतानाच रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे.
पुणे : मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार असल्याचा सांगावा हवामान विभागाने नुकताच दिला असताना आज पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमौसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे शहर व परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २४ मिमी तर लोहगाव येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेले काही दिवस दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असतानाच रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली होती. त्याचा परिणाम आज दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोरही कमी झाला. साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. काही वेळानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या.
दक्षिण पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून ते दक्षिण तामिळनाडुपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पुणे शहर व परिसरात आकाश सायंकाळनंतर ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणार असाल व सायंकाळी परत येणार असाल तर बरोबर छत्री अथवा रेनकोटजवळ बाळगण्याची दक्षता घ्यावी.