Weather Alert! श्रीवर्धन, मालवणला अतिवृष्टी; पुढील २ दिवस राज्यात अनेक ठिकाणी 'वरुणराजा' बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:06 PM2021-06-16T21:06:31+5:302021-06-16T21:10:16+5:30
श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला.
पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत पसरले असल्याने कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पेरण्यांसाठी अधिक पावसाची अपेक्षा आहे.
गेल्या २४ तासात श्रीवर्धन २१०, मालवण १९०, सावंतवाडी १७०, वैभववाडी १६०, देवगड, मुरुड, पेडणे १५०, कणकवली १४०, गुहागर, वाल्पोई, वेंगुर्ला १३०, दोडामार्ग, सांगे १२०, मुळदे, राजापूर, रत्नागिरी, रोहा ११०, दाभोलीम, खेड, म्हापसा, मडगाव, मार्मागोवा, म्हसळा, फोंडा १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच कोकणात सर्व दूर जोरदार पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्रात गगनबावडा १७०, आजारा १६०, चांदगड ९०, राधानगरी ८०, गडहिंग्लज ७०, महाबळेश्वर ६० मिमी पाऊस झाला.
मराठवाड्यात जळकोट ५०, कैज ४०, चाकूर, रेणापूर ३० मिमी पाऊस पडला.
विदर्भात वाशिम ५०, दिग्रस, मालेगाव, मंगळूरपीर, मानोरा ४० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) ७०, अम्बोणे ५०, ताम्हिणी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर ४५, कोल्हापूर ४५, सातारा १३, सांगली ६, मुंबई ९९, सांताक्रूझ २४, अलिबाग ३७, रत्नागिरी ५२, पणजी ४७, डहाणु ३, परभणी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातार्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
........
पुण्यात हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरात आज दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र, त्यात जोर नव्हता. पुणे शहरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.