Weather Alert : रत्नागिरीत अतिवृष्टी, विदर्भात मुसळधार तर, मध्य महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 19:37 IST2021-06-14T19:36:40+5:302021-06-14T19:37:32+5:30
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Weather Alert : रत्नागिरीत अतिवृष्टी, विदर्भात मुसळधार तर, मध्य महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा
पुणे : मुंबईसह कोकणात हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर मुंबईत पाऊस झाला नसला तरी कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून रत्नागिरीत अतिवृष्टी झाली. विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
गेल्या २४ तासात रत्नागिरी २४०, कणकवली, राजापूर १३०, दोडामार्ग, सावंतवाडी १२०, दापोली, मुल्दे ११०, गुहागर, लांजा, म्हसळा, संगमेश्वर, देवरुख, वालपोई ९०, माणगाव ८०, कुडाळ, पोलादपूर ७० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रात चांदगड, गगनबावडा ५०, महाबळेश्वर ३०, आजारा, लोणावळा २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील धर्माबाद ९०, परभणी ७०, हदगाव ६०, अहमदपूर, किनवट, माहूर ५०, अर्धापूर, जिंतूर, उमारी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती.
विदर्भातील आर्णी ८०, बल्लारपूर, गौड पिंपरी ५०, चंद्रपूर, उमरखेड ४०, दिग्रस, घाटंजी, जिवती, राजुरा ३० मिमी पाऊस झाला असून सर्वदूर हलका पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर मात्र पावसाचे प्रमाण अजूनही कमी आहे. रविवारी रात्रभर मुसळधार पावसानंतर सोमवारी दिवसभरात रत्नागिरीमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून दिवसभरात केवळ ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर ३ आणि कोल्हापूर १ मिमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांबरोबरच विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.