Weather Alert : राज्यात मॉन्सून पुन्हा अॅक्टिव्ह! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भात मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 08:44 PM2021-07-08T20:44:22+5:302021-07-08T20:45:41+5:30
१० जुलैपासून राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने वर्तविला अंदाज...
पुणे : बंगालच्या उपसागरावरुन कमी उंचीवरुन बाष्पयुक्त वारे वाहण्याचा सुरुवात झाली असून तसेच अरबी समुद्रावरुनही येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने कोकणासह राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. येत्या २४ तासांत कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची १० ते १२ जुलै दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच १२ जुलै रोजी कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यात ऑरेंट अलर्ट दिला असून घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात रामेश्वरी ९०, राजापूर ८०, अलिबाग, दापोली, कणकवली, खालापूर, कुडाळ, मंडणगड, मुरुड ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, करमाळा, लोणावळा येथे ३० मिमी पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील धर्माबाद, किनवट, मुदखेड ७०, बिलोली, कंधार, निलंगा ५०, आंबेजोगाई, बदनापूर, हदगाव, लातूर, नायगाव, खैरगाव, नांदेड, उमारी ४० मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला.
विदर्भात देसाईगंज १२०, अर्जुनी मोरगाव, देवरी ६०, कुरखेडा, मोहाडी ५०, भामपूरी, गोंदिया, गोरेगाव, नागभीर, सडक अर्जुनी ४० मिमी पाऊस पडला. तसेच अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील ताम्हिणी ६०, खोपोली ४० मिमी पाऊस झाला.
विदर्भात जाेरदार पाऊस
विदर्भात गुरुवारी दिवसभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नागपूर ९९, गोंदिया ७४, वर्धा २१, चंद्रपूर १२, अकोला ३, मुंबई ८ सांताक्रूझ १७, अलिबाग २, रत्नागिरी १३, पणजी १३, डहाणु १२, महाबळेश्वर ९, पुणे ३, सातारा ६ मिमी पाऊस झाला आहे.
शुक्रवारी मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जुलैपासून राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.