Weather Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:20 PM2021-05-08T21:20:50+5:302021-05-08T21:21:00+5:30
पुण्यासह सातारा, महाबळेश्वर, गोंदिया, नागपूरला पाऊस
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेले काही दिवस मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटकापर्यंत असलेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचवेळी उत्तर मध्य प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंतचा कमी दाबाचे क्षेत्र आता विरुन गेले आहे. त्यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. या पावसामुळे विदर्भाच्या काही भागातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्याचवेळी कोकण, गोव्यातील कमाल तापमानात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.२ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २० अंश सेल्सिअस नोंदविले आहे.
गेल्या २४ तासांत कोल्हापूर २३, पणजी, सातारा येथे १ मिमी पावसाची नोंद झाली होती. शनिवारी दिवसभरात पुणे ०.३, लोहगाव ६.८, पाषाण ४.४ मिमी, महाबळेश्वर ७, सातारा ०.२, गोंदिया २ आणि नागपूर येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी तसेच संपूर्ण विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सातारा, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे.