Weather Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अति तीव्र 'यास' चक्रीवादळ बुधवारी सकाळी धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:13 PM2021-05-25T20:13:07+5:302021-05-25T20:16:08+5:30
मॉन्सूनची नैऋत्य, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात आणखी पुढे वाटचाल...
पुणे : नैऋत्य मॉन्सूनने मंगळवारी मालदीव -कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. तसेच दक्षिण -पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले यास चक्रीवादळाचे आता अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ते बुधवारी पहाटे ओडिशा - पश्चिम बंगालच्या पारादीप आणि बालासोर दरम्यान धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अंदमान निकोबार बेटावर वेळेवर आगमन झालेले मॉन्सूनचे वारे २२ ते २४ मे दरम्यान तेथेच स्थिरावले होते. मंगळवारी त्याने श्रीलंकेचा अर्धा भाग, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात प्रगती केली आहे. मालदीव, कोमोरिन भागाच्या दक्षिण -पश्चिम आणि पूर्व -पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात मॉन्सूनच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती बनली आहे. पुढील ४८ तासात पश्चिम बंगालचा उपसागर आणि संपूर्ण दक्षिण पूर्व बंगालचा उपसागरातील काही भागात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले यास चक्रीवादळाचे मंगळवारी सायंकाळी अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ ताशी १५ किमी वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजता ते ओडिशातील पारादीपपासून २०० किमी, बालासोर आणि पश्चिम बंगालमधील दिघापासून २९० किमी दूर होते. हे चक्रीवादळ बुधवारी पहाटेच्या सुमारास पारादीप ते धर्मा पोर्ट दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४१.८ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.