पाच दिवस आता थंडी आणि पावसाचे!
By श्रीकिशन काळे | Published: January 6, 2024 07:30 PM2024-01-06T19:30:33+5:302024-01-06T19:32:20+5:30
कमी दाबाच्या क्षेत्राचा पट्टा हा विदर्भातून जात आहे. त्यामुळे तिथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पुणे : राज्यामध्ये ढगाळ वातावरण पसरलेले असून, विदर्भात काही ठिकाणी शनिवारी पावसाने हजेरी देखील लावली आहे. आजपासून मंगळवारपर्यंत (दि.१०) राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शहरातही आकाश भरून आले असून, पावसाची शक्यता आहे. तसेच थंडी देखील पडणार आहे.
वायव्य आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा पट्टा हा विदर्भातून जात आहे. त्यामुळे तिथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शनिवारी विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस राज्यात धुके पडण्याची शक्यता आहे.
विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी ९ तारखेला पावसाची शक्यता अधिक जाणवते. तर केवळ ९ तारखेला पश्चिम मध्यप्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्याच्या तुरळक भागात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर गुरुवारी ( दि.११) अमावस्येपासून, उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे वाहण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते आहे.
- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ