वेधशाळाच देणार मोबाईलवर हवामानाचा अंदाज
By admin | Published: December 24, 2014 01:33 AM2014-12-24T01:33:04+5:302014-12-24T01:33:04+5:30
विविध खासगी संस्था वेधशाळेचा अंदाज मोबाईलवर देण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असतानाच त्यात आता शासनाचा भारतीय हवामानशास्त्र विभागही उतरला आहे.
राहुल कलाल, पुणे
विविध खासगी संस्था वेधशाळेचा अंदाज मोबाईलवर देण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असतानाच त्यात आता शासनाचा भारतीय हवामानशास्त्र विभागही उतरला आहे. कोणत्याही संस्थेच्या मार्फत न जाता हवामानशास्त्र विभागाने स्वत:चा अॅन्ड्रॉइड अॅप विकसित केला आहे. ‘इंडियन वेदर’ असे नाव असलेला हा अॅप इतर अॅपप्रमाणे कोणीही सहजरीत्या डाऊनलोड करू शकणार आहे. यामुळे आता नागरिकांना शासनाचा अचूक अंदाज घरबसल्या मिळणार आहे.
शंभरी उलटलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाचा हवामानाचा अंदाज वर्तविण्यावर दबदबा होता. गेल्या १० वर्षांपूर्वीपर्यंत देशात हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारी हवामानशास्त्र विभाग ही एकमेव संस्था होती. मात्र, ही संस्था सरकारी असल्यामुळे ती नागरिकांपासून दुरावलेलीच होती. हवामानाचा अंदाज तळागाळापर्यंतच पोहोचत नव्हता. मात्र, गेल्या १० वर्षांत खासगी संस्थांनी हवामान अंदाज वर्तविण्याच्या क्षेत्रात उडी घेतल्याने स्पर्धा निर्माण झाली. या क्षेत्रातील फायदा लक्षात घेऊन विविध खासगी संस्था, कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली. अशा या स्पर्धेत मागे पडत असल्याचे लक्षात येताच हवामानशास्त्र विभागाने आपले अंदाज सर्वसामान्यांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत स्वत:चे संकेतस्थळ आणि प्रत्येक प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे म्हणजेच वेधशाळांची संकेतस्थळे सुरू करण्यात आली. सुरुवातीला बेसिक असलेली ही संकेतस्थळे काळाच्या ओघात अपडेट होत गेली. यामुळे नागरिकांपासून दुरावलेल्या वेधशाळा पुन्हा त्यांच्या जवळ गेल्या. शासकीय संस्था असल्यामुळे नागरिकांच्या या संस्थांच्या माहितीवर विश्वास असल्याने संकेतस्थळे पाहण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली.
याच काळात खासगी संस्थांनी पुढे जात अॅन्ड्राईड मोबाईल अॅप विकसित करून त्यावर नागरिकांना घरीच हवामानाची माहिती देण्यास सुरुवात केली. हे लक्षात घेताच भारतीय हवामानशास्त्र विभागानेसुद्धा मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही खासगी संस्थेच्या माध्यमातून हे अॅप विकसित करण्यापेक्षा विभागाने स्वत:च हा अॅप विकसित केला, अशी माहिती हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ राहुल सक्सेना यांनी दिली.
‘इंडियन वेदर’ नावाचे हे अॅप मोफत असून, अॅन्ड्राईड मोबाईल वापरत असलेले कोणीही ते डाऊनलोड करू शकतो. प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध झाले असून, इतर अॅप डाऊनलोड करतात. त्याप्रमाणेच ते करता येते, असेही सक्सेना यांनी सांगितले.