Weather Update : मोठी बातमी! मॉन्सूनचे वारे कमकुवत; पुढील ७ दिवस देशभरातील बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:06 PM2021-06-23T19:06:46+5:302021-06-23T19:07:01+5:30

अनुकूल वातावरण नसल्याचा परिणाम, राज्यातील पाऊसमानही कमी राहणार

Weather Update: Big News! Monsoon winds weak; No heavy rains chance in most parts of the country for the next seven days | Weather Update : मोठी बातमी! मॉन्सूनचे वारे कमकुवत; पुढील ७ दिवस देशभरातील बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी

Weather Update : मोठी बातमी! मॉन्सूनचे वारे कमकुवत; पुढील ७ दिवस देशभरातील बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी

Next

पुणे : मॉन्सूनचे वार कमकुवत असल्याने पुढील ७ दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा अधिक वेगाने वाटचाल करीत देशातील बहुतांश भागात आगमन केले. राजस्थानचा काही भाग, दिल्ली, हरियाना आणि पंजाबच्या काही भागात अजून मॉन्सून पोहचलेला नाही. सध्या मॉन्सूनची सीमा रेषा बारमेर, भिडवाडा, धुलपूर, अलिगड, मिरत, अंबाला आणि अमृतसर अशी आहे. १९ जूनपासून मॉन्सूनची वाटचाल थांबलेली आहे़.

सध्या मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वार्‍यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात २४ ते २६ जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील ७ दिवस मॉन्सूनचे वारे कमकुवत राहणार आहे. 

बंगालच्या उपसागरात ३० जूनपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसून येत नाही. त्यामुळे देशातील मध्य भारत, पश्चिम भारत, दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पावसाची शक्यता पुढील ७ दिवसात दिसून येत नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात केवळ किनवट येथे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील कुही ७०, भंडारा, भिवापूर, कोरपना, लाखनदूर, लाखनी, मौदा, पौनी ५० मिमी पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. 
बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर ३८, रत्नागिरी ८, भंडारा २३, गोंदिया १३, वर्धा २ मिमी पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. 

राज्यात पुढील तीन दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Weather Update: Big News! Monsoon winds weak; No heavy rains chance in most parts of the country for the next seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.