Weather Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून पुण्यासह 'या' १६ जिल्ह्यांत 'ऑरेंज' अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:41 PM2021-09-08T17:41:09+5:302021-09-08T17:42:02+5:30
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र पाऊस होत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, पाबळ येथे सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यांसह राज्यातील १६ जिल्ह्यांना बुधवारी( दि. ८) ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. तसेच कोकणात आज अनेक ठिकाणी तीव्र मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोळा जिल्ह्यांना 'ऑरेंज' अलर्ट
पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, अकोला आणि अमरावती
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, पाबळ येथे सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत शिवाजीनगर येथे २०.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेला पाऊस. मगरपट्टा २० मिमी, चिंचवड ३०.५, एनडीए १४.५, गिरीवन ९, डुडुलगाव २६, माळीण (आंबेगाव) १८, तळेगाव ढमढेरे ४९, पाषाण १७, बल्लाळवाडी (जुन्नर) २८, लवळे १४.५, एनईएस लकडी(इंदापूर) १५, पाबळ (शिरूर) ९३ मिमी, वडगाव शेरी ४५, खडकवाडी (आंबेगाव) ५६, वाल्हे (पुरंदर) ४३.५, वेताळे (खेड) १४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी शहरात आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.