Weather Update: जुलैमध्ये देशात सामान्य पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात चिंताजनक स्थितीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:36 PM2021-07-01T18:36:05+5:302021-07-01T19:38:49+5:30
मॉन्सूनच्या दृष्टीने पुढील १० दिवसात अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्याची शक्यता कमी
पुणे : सध्या मॉन्सूनमध्ये खंड पडला असला तरी जुलै महिन्यात देशभरात सर्वसाधारण (९४ ते १०६ टक्के) पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील १० दिवसात मॉन्सूनच्या पावसामध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नसून ११जुलैनंतर देशातील बहुतांश भागात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा मॉन्सूनने देशातील अनेक भागात नेहमीपेक्षा लवकर आगमन केले आहे. साधारणपणे मॉन्सून ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता असते. मात्र, आता दिल्लीसह राजस्थानमधील काही भागात अजूनही मॉन्सून पोहचला नाही. येत्या १० जुलैपर्यंत त्यात प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
महापात्रा यांनी सांगितले की, संपूर्ण देशाचा विचार करता देशभरात जून महिन्यात १० टक्के अधिक वर्षा झाली आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामानाने दक्षिण भारतात सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे.जुलै महिन्यांचा विचार करता संपूर्ण देशात जुलै महिन्यात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.
मॉन्सूनच्या दृष्टीने पुढील १० दिवसात अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्याची शक्यता कमी आहे. या काळात देशातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हिमालयीन पर्वतीय भाग, बिहार व ईशान्य भारतात चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा विचार करता जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील दक्षिणेकडील भाग तसेच मराठवाड्यातील तेलंगणाला लागून असलेल्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वकडील भागात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता
हवामान विभागाने जुलै महिन्याचा अंदाज जाहीर केला असून त्यानुसार महाराष्ट्रात जुलै महिन्यात सर्वसाधारणपणे कमी पावसाची शक्यता आहे. सर्वात मोठा फटका पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भाला बसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील धरणांवर पश्चिम महाराष्ट्राचा पाणीपुरवठा अंवलंबून असतो. याच भागात जुलै महिन्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याचा नांदेडकडील काही भाग तसेच पूर्व विदर्भात कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात विशेष कच्छ, सौराष्ट्रामध्ये जुलै महिन्यात कमी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात चांगल्या पावसाची शक्यता आहे.