Weather Update: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमौसमी पावसाच्या सरी; पुढील २४ तासांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:17 PM2021-05-31T21:17:51+5:302021-05-31T21:29:46+5:30
गेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
पुणे : गेल्या चार दिवसात मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झाली नसतानाच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर्वमौसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी पुणे शहरात सायंकाळी सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी आल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे १५ मिमी तर, लोहगाव येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
पुण्याबरोबर सांताक्रुझ ४८, पणजी ०.६, महाबळेश्वर ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माथेरान ७३, ओझर २२, धुळे १७, मार्गागोवा १४, अकोला १४, पेंडा १३ मिमी पावसाची नोंद झाली होती.
१ जून रोजी पालघर, लातूर, परभणी, उस्मानाबाद हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात १ मार्च पासून आतापर्यंत १२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ७५ मिमी ने अधिक आहे.
कोथरुडमध्ये एका तासात ६४ मिमी पाऊस
शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाचा अधिक जोर दिसून आला. आशय मेजरमेंटनुसार कोथरुडमध्ये एका तासात तब्बल ६४ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला. कोथरुडमध्ये सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत ६८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोथरुड, सिंहगड रोड, खडकवासला, नगर रोड परिसरात धुवांधार पाऊस झाला. त्याचवेळी कात्रज, आंबेगाव परिसरात पावसाची हलकी सर आली होती.
रात्री साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस(मिमी)
शिवाजीनगर १६.६
पाषाण ४०
खडकवासला ३४
कोथरुड ६८.४
वारजे ३५.४
कात्रज २.६