आषाढातही लग्नसराई सुरू, मात्र मुहूर्त आणि कोरोनामुळे कार्यालये पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:50+5:302021-07-16T04:08:50+5:30
पुणे : पूर्वीपासूनच आषाढ महिना लग्नकार्यासाठी अशुभ मानला जातो. पण मागील काही वर्षात आषाढातही लग्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
पुणे : पूर्वीपासूनच आषाढ महिना लग्नकार्यासाठी अशुभ मानला जातो. पण मागील काही वर्षात आषाढातही लग्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या नवीन पिढीकडून मुहूर्त नसला तरी आषाढ महिन्यातही मुहूर्त काढून लग्न केले जात असल्याचे पुरोहितांनी सांगितले. पण आता लग्नकार्य होत असले तरी कोरोना आणि लग्नाचे मुहूर्त यामुळे कार्यालयाच्या बुकिंगवर गदा आल्याचे कार्यालय प्रमुखांचे म्हणणे आहे.
आषाढ महिन्यात लग्नसराई सुरू झाली आहे. तरी कार्यालये ओस का पडली आहेत याची चाचपणी ‘लोकमत’ने कार्यालय प्रमुख आणि गुरुजींशी संवाद साधला.
आषाढ महिना सुरू झाला की पहिले दहा दिवस लग्न मुहूर्त असतात. चातुर्मास सुरू झाल्यावर लग्नकार्य केले जात नाही. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लग्नसराईला पुन्हा सुरुवात होते. परंतु नवीन पिढी या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळे मुहूर्त नसतानाही लग्नासाठी पंचांग बघितले जाते. तसेच अनेक विद्यार्थी परदेशातून आषाढ महिन्याच्या आसपासच मायदेशी येत असतात. चार आषाढ महिन्यानंतर चार महिने वाट पाहणे. त्यांच्यासाठी अशक्य असते. म्हणून लग्न होऊ लागली आहेत. परंतु शहरातील लग्नकार्यालये ओस पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात मर्यादित लोकांमुळे कार्यालय बुकिंगवर गदा आली आहे. नागरिक बंधनामुळे शक्यतो सोसायटी, घराच्या अंगणात, मोकळ्या जागेत लग्नसोहळा पार पाडत असल्याचे कार्यालय प्रमुखांनी सांगितले आहे.
चौकट
लग्न सुरू पण बुकिंग नाही
सद्यस्थितीत महिन्याला एक-दोन बुकिंग होतात. मर्यादित लोक आणि वेळेच्या निर्बंधामुळे कार्यालय भाड्यातही १५ ते २० हजार रुपयांचा फरक पडला आहे. आधी पूर्ण दिवस कार्यालय दिले जात होते. आता सकाळी ७ ते ४ किंवा ७ ते २ यावेळेतच कार्यालय घेतले जाते. त्यासाठीही तेवढेच भाडे आकारले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात लग्नसराईसाठी जुलै महिन्यापर्यंत बुकिंग झाले होते. पण मध्यंतरी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने सर्व बुकिंग रद्द झाले आहेत.
चौकट
५० लोकांची परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाकार्यासाठी ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये प्रमुखांकडून पोलीस परवानगी, ५० लोकांची नावे मागितली जात आहेत. परंतु काही लग्नांमध्ये ३० ते ३५ लोक येत असल्याने कार्यालयातून कडक नियम लावले जात नाहीत. परंतु मास्क, सॅनिटायजर वापर करण्याच्या सूचना प्रमुख देत आहेत.
चौकट
आषाढ महिन्यात पावसाळा आणि शेतीची कामे
“आषाढ महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. तसेच शेतातील लावणी, पेरणीची कामे याच महिन्यात होतात. त्यामुळे लग्नसराईला बाहेर गावच्या नातेवाईकांना येणे शक्य नसते. हेच सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आषाढ महिन्यात मुहूर्त नसतो असे शास्त्रात लिहिले आहे. पण सद्यस्थितीत लग्नकार्यात एकत्र येणे शक्य नसल्याने आषाढ महिन्यात लग्न होत नाहीत.”
-डॉ. माधव केळकर गुरुजी
चौकट
चातुर्मासात लग्न, मुंज करू नये
“आषाढ महिना सुरू झाल्यावर पहिले दहा दिवस लग्न, मुंज असे विधी करता येतात. पण चातुर्मास सुरू झाल्यावर कार्तिक महिन्यापर्यंत लग्नाचा मुहूर्त नसतो. असे शास्त्रात दिले आहे. परंतु सद्यस्थितीत नवीन पिढीकडून हे पाळले जात नाही. नक्षत्र, वार, स्थिती, पंचांग बघून मुहूर्त काढले जातात.”
- विश्वनाथ वैशंपायन गुरुजी