विवाह मंडपातच नववधूने भावाला दिले वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क सोडपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:35+5:302021-07-21T04:08:35+5:30
संजय केरू नवले यांची कन्या सिद्धी व लोणीकंद (ता. हवेली) येथील संजयराव सोपान कंद यांचे चिरंजीव शुभम यांचा लग्नसमारंभ ...
संजय केरू नवले यांची कन्या सिद्धी व लोणीकंद (ता. हवेली) येथील संजयराव सोपान कंद यांचे चिरंजीव शुभम यांचा लग्नसमारंभ मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. सध्या विविध ठिकाणी कार्यालयात कोरोनाचे नियम पाळून लग्नसोहळे होत आहेत. अनेक विवाह सोहळे मोठ्या थाटामाटात होत असल्याने पैशाचा अपव्यय होताना दिसतो. परंतु या लग्नाचे वेगळेपण म्हणजे नवरी मुलगी सिद्धी हिने शुभविवाहाच्या मंचावर उभयांतामध्ये झालेल्या नियोजनानुसार भाऊ व्यंकटेश संजय नवले याच्यासाठी वडिलोपार्जित जमिनीवरील स्वतःचे हक्क सोडलेले व नोंदणी केलेले रजिस्टर हक्क सोडपत्र सर्वांसमक्ष दिले.
समाजामध्ये वडिलार्जित तसेच वडिलोपार्जित जमीन संपत्तीच्या हक्कावरून वाद होत असल्याने रक्ताच्या नात्यामध्येदेखील दुरावा निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळतात. परंतु नवले परिवारातील सिद्धी हिने स्वखुशीने हक्क सोडपत्र दिल्याने समाजासाठी चांगला पायंडा पाडून आदर्श निर्माण केला आहे.
राज्यातील पहिलेच उदाहरण..
समाजामध्ये अनेक कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित जमीन संपत्तीच्या हक्कावरून वाद होताना आपण पाहतोय. परंतु संजय नवले यांची कन्या सिद्धी हिने मनाचा मोठेपणा दाखवून वारसा हक्काने येणाऱ्या कौटुंबिक संपत्तीवरील हक्क सोडपत्र दिल्याचा निर्णय राज्यातील प्रथमच उदाहरण असून समाजाला निश्चितच आदर्शवत आहे.
- प्रदीप कंद, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद
शाळेसाठी देखील अर्थसहाय्य..
नवरदेव मुलाचे वडील लोणीकंदचे माजी उपसरपंच संजयराव सोपान कंद यांनी देखील सामाजिक कार्य व गोरगरीब व ज्ञानदान क्षेत्रासाठी संपत्तीदान व धनदान करण्याची चांगली परंपरा जोपासली असून, डॉ. बसू विद्याधाम शाळेच्या नवीन इमारतीसाठी स्वच्छेने एक्कावन हजाराचा धनादेश मुख्याध्यापक शांतीलाल ब्राह्मणे यांच्याकडे सुपूर्द केला.