पुण्यात विनासायास पार पडताहेत लग्नकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:30+5:302020-12-24T04:10:30+5:30
पुणे : मंगल कार्यालयांना लग्नकार्यासाठी शासनाने काही अटी घालून दिलेल्या असल्या तरी परवानगीची अट नसल्याने पुण्यात विनासायास लग्नकार्य पार ...
पुणे : मंगल कार्यालयांना लग्नकार्यासाठी शासनाने काही अटी घालून दिलेल्या असल्या तरी परवानगीची अट नसल्याने पुण्यात विनासायास लग्नकार्य पार पडत आहेत. ना पोलिसांचे विघ्न, ना पालिकेचा अडथळा यामुळे मंगलकार्यालयांमध्ये आनंदात सनई-चौघडे वाजत आहेत. वधू-वरांच्या नातेवाईकांची परवानगीसाठीची वणवण कमी झाल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्यानंतर मंगलकार्यालयांमध्ये लग्नकार्य, मंगलकार्याला परवानगी देण्यात आली. माणसांच्या संख्येची मर्यादा घालून दिल्यामुळे व-हाडी मंडळी मर्यादितच आमंत्रित करावी लागत आहेत. कोरोना संक्रमणाचा काळ असल्यामुळे नातेवाईक आणि आप्तेष्टही निमंत्रण नसले तरी वाईट मानून घेत नाहीत असे एका वरपित्याने सांगितले.
लॉकडाऊननंतर आता लग्न करण्याची परवानगी मिळत असली तरी या परवानगीसाठी कसरत करावी लागते की सर्व परवानग्या सहज मिळतात याची माहिती घेण्यासाठी शहरातील विविध मंगल कार्यालयांशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. परंतु, आम्ही लग्नाकरिता पोलीस अथवा पालिकेची परवानगी घेत नाही. लग्नकार्य बुक झाल्यानंतर सर्व विधी कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडत असल्याचे सांगण्यात आले.
लग्नासाठी बुकींग केलेल्या मंगल कार्यालयाचा अर्ज घेऊन पालिकेच्या अधिका-यांकडे जाण्याची आवश्यकताच भासत नाही. त्यामुळे वधू-वराचा जन्माचा दाखल, टीसी, आधार, रहिवासी पुरावा आणि अर्ज देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कार्यालय चालकांनी सांगितले. वास्तविक लग्न झाल्यानंतर त्याची शासकीय नोंदणी करण्याकरिता निबंधक म्हणून नेमलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांक डे विवाह नोंदणी अर्जासोबत ही कागदपत्रे द्यावी लागतात. पोलीस ठाण्याकडूनही कोणत्याही कागदपत्रांची अथवा परवानगीची मागणी होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
====
लग्नासाठी अटी
शहरात लग्नकार्यासाठी सध्या फक्त ५० माणसांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. यासोबतच सुरक्षित अंतर राखले जाणे, मास्क परिधान करणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मनुष्य संख्येचे मात्र उल्लंघन होताना दिसते.
====
माझ्या बहिणीचे लग्न गुरुवारी आहे. या लग्नासाठी आम्ही नगर रस्त्यावरील मंगलकार्यालय बुक केले आहे. परंतु, आम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अथवा पुरावे मागण्यात आलेले नाहीत. तसेच, पालिका आणि पोलिसांकडून परवानगी आणा असेही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्हाला परवानगीसाठी कसलाही त्रास झालेला नाही.
- अॅड. परिमल देशमुख, केशवनगर, मुंढवा
====
पालिकेच्या परवानगीची नाही गरज
मंगल कार्यालयांना पालिकेच्या परवानगीची गरज नाही. आमच्याकडे लग्नासाठी परवानगी मागितली जात नाही. तरीदेखील नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेश आणि सुरक्षा निकषांचे पालन करुन सजगता दाखवावी.
- आशिष महाडदळकर, सहायक आयुक्त, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय