पुणेकरांचे टेन्शन वाढले; बुधवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक; शहरात ३ महिन्यानंतर रुग्णसंख्या दोनशेहुन अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:17 PM2021-12-29T19:17:23+5:302021-12-29T19:17:37+5:30
नाताळच्या सुट्ट्या, वातावरणातील बदल, विविध ठिकाणी होणारी गर्दी व मास्कचा कमी झालेला वापर यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून नव्या कोरोबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसून आला आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन आठवड्यापासून दिवसेंदिवस वाढ असताना, बुधवारी यामध्ये उच्चांकी वाढ झाली असून दिवसभरात २३२ नवे रूग्ण आढळून आले आहेत. शहरात १६ सप्टेंबरनंतर प्रथमच बुधवारी २०० हुन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. नाताळच्या सुट्ट्या, वातावरणातील बदल, विविध ठिकाणी होणारी गर्दी व मास्कचा कमी झालेला वापर यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून नव्या कोरोबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसून आला आहे.
बुधवारी दिवसभरात ६ हजार ६०० जणांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी ३.५१ टक्के इतकी आहे. शहरात गेल्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधितांची टक्केवारी २ टक्क्यापर्यंत (शंभर तपासणीमागील बाधित) मर्यादित असलेली टक्केवारी, गेल्या दोन दिवसांपासून साडेतीन टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या १ हजार २१८ इतकी झाली असून, २४ तासात या संख्येत दीडशेने वाढ झाली आहे. आज दिवसभरात ८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात कोरोनामुळे आज कोणाचा मृत्यू झाला नसला तरी, शहराबाहेरील ३ जण उपचारादरम्यान दगावले आहेत. सध्या विविध रुग्णालयात ९० गंभीर रुग्णांवर तर, ५४ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३८ लाख ५२ हजार ९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५ लाख ९ हजार ५०८ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९९ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे.