आठवड्यातच आरोपी जेरबंद
By admin | Published: May 12, 2014 03:52 AM2014-05-12T03:52:45+5:302014-05-12T03:52:45+5:30
मानसोपचार तज्ज्ञ आणि मतिमंदांसाठी काम करणार्या संस्थेची मदत घेऊन पोलिसांनी आठवडयातच मतीमंद तरूणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींचा छडा लावला.
पिंपरी : मानसोपचार तज्ज्ञ आणि मतिमंदांसाठी काम करणार्या संस्थेची मदत घेऊन पोलिसांनी आठवडयातच मतीमंद तरूणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींचा छडा लावला. बोपखेल येथील मतिमंद तरुणीवर सामुहिक बलात्कार करणार्या तीन नराधमांना जेरबंद करण्यात भोसरी पोलीसांना यश आले आहे. विजयपाल भिक्की सिंग (वय २२, रा. खंडाळा, जि. पुणे, मूळ राजस्थान), दिलावर हाफिज खान (वय २४, रा. वलवणगाव, लोणावळा), यासीन शाकिर खान (वय ३५, रा. लोणावळा, जि. पुणे, दोघेही मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील विजयपाल लोणावळ्यात रखवालदार म्हणून कामास आहे, तर इतर दोघेजण केटरिंगचे काम करतात. पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बोपखेल येथील पीडित मतिमंद तरुणी भाऊ रागावल्याने ३० एप्रिलला दुपारी घरातून निघून गेली होती. आरोपींमधील विजयपाल याने तरुणीला फसवून पुण्याला नेले. तेथून रेल्वेने लोणावळ्याला नेले. त्यानंतर कार्ला येथील एका लॉजवर विजयपाल व त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा पुण्यात आणून सोडले. घरी परतल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत तरुणीने आईला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरुणी मतिमंद असल्याने माहिती पुरेशी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे या प्रकरणात मानसोपचार तज्ज्ञ व मतिमंदांसाठी काम करणार्या संस्थेतील महिला सदस्यांची मदत घेण्यात आली. पीडित मुलीची विचारपूस करीत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत भोसले, सहायक पोलीस निरिक्षक रविकिरण दरवडे, हवालदार पी. बी. तापकीर, किरण काटकर, महेश खांडे, लक्ष्मण नरवडे, राजेंद्र राठोड, योगीता गोडगे, मिरा क्षिरसागर आदींनी केली. पत्रकार परिषदेस सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)