आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर पहिल्यांदाच सातवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:48+5:302021-01-04T04:09:48+5:30
पुणे : कोविड चाचण्यांची कमी झालेली संख्या मागील आठवड्यात पुन्हा वाढली. मात्र, त्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या आढळून येण्याचे प्रमाण ...
पुणे : कोविड चाचण्यांची कमी झालेली संख्या मागील आठवड्यात पुन्हा वाढली. मात्र, त्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या आढळून येण्याचे प्रमाण कमी असल्याने कोरोना कहर कमी झाल्यानंतर, पहिल्यांदाच आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर ७ टक्क्यांवर आला आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९५.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
शहरात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. दिवाळीनंतर काही प्रमाणात रुग्णवाढ दिसून आली होती. पण, त्यानंतर रुग्णसंख्येतील वाढ सातत्याने स्थिर राहिली. तर, २७ डिसेंबर ते २ जानेवारी या आठवड्यातील रुग्णसंख्या चाचण्यांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यानंतर पहिल्यांदाच सात टक्क्यांच्या खाली आली आहे. या आठवड्यात मागील महिनाभरातील सर्वाधिक चाचण्या झाल्या. त्यामध्ये केवळ १४३६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यूचे प्रमाणही स्थिर असून, या आठवड्यात २७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूदर १.८८ टक्के राहिला.
दरम्यान, शहरातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ जानेवारी रोजी १ लाख ७१ हजारांच्या पुढे गेल्याने एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ९५.७१ टक्क्यांवर पोहोचले. आठवडाभरातील हा दर पहिल्यांदाच ९५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. नवीन रुग्ण, सक्रिय रुग्ण, मृत्यूचा आलेख खाली येऊ लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे.
---
मागील काही आठवड्यांतील स्थिती
कालावधी चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यूदर
२७ डिसें. ते २ जाने. २०,४९० १४३६ ७ १.८८
२० ते २६ डिसें. १६,८६२ १५१५ ८.९८ १.७८
१३ ते १९ डिसें. १७,७५५ १७३० ९.७४ १.९६
६ ते १२ डिसें. १९,४०४ १६४१ ८.४५ २.६२
२९ नोव्हें. ते ५ डिसें. २०,३१४ १९७५ ९.७१ १.२६
२२ ते २८ नोव्हें. २२,८६१ २४१२ १०.५५ १.३२