सुवर्णपदक विजेती हर्षदाने गळक्या पत्र्याचा शेडमध्ये तोकड्या साधनसामुग्रीसह केला होता सराव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:56 PM2022-05-16T17:56:55+5:302022-05-16T18:03:03+5:30
"शासनाने खेळाडूंना मूलभूत व अद्यायावत सुविधा दिल्यास अशा एक नाही, तर शेकड्याने हर्षदा होतील..."
- हणमंत पाटील
पुणे : पुण्यातील वडगाव मावळच्या हर्षदा गरुडने ग्रीसच्या आंतरराष्ट्रीय जुनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या देशासाठी इतिहास घडविला. त्या वडगावातील तिची कौटुंबिक पार्श्वभूमी, तिने सराव केलेले ट्रेनिंग सेंटर, तिचे कोच कोण असतील, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. सद्या ग्रीसला स्पर्धेला गेली असल्याने हर्षदा गरुडला प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते. मग, आम्ही तिच्या आईवडिलांना भेटण्याचे ठरविले. त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केलेल्यानंतर दोघांनीही हर्षदाचे प्रशिक्षक व कोच असलेले बिहारीलाल दुबे यांना आवर्जुन भेटण्याचा सल्ला दिला.
हर्षदाच्या सुवर्ण भरारीने जगाच्या नकाशावर गेलेल्या वडगाव मावळविषयी उत्सुकता वाढली. पुणे शहरापासून अवघ्या ४० किलो मीटरवरील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ हे १४ हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला नुकताच नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे गावाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना रस्त्याची कामे सुरू होती. गावात प्रवेश केल्यानंतर दुबे यांचे क्रीडा संकुल कुठे आहे, अशी चौकशी केली. त्यावर नागरिकांना काही समजले नाही, पण पुढे ३०० मीटर गेल्यानंतर पंचमुखी मंदिरासमोर ‘दुबे गुरुकुल’ असल्याचे सांगत एक छोटा मुलगा आम्हाला घेऊन एका बोळीत घुसला. थोडे चालल्यानंतर समोर एक पत्र्याचे शेड दिसले, त्याच्या बाजुलाच दुबे राहत असल्याचे सांगितले.
ज्या पत्र्याच्या शेडच्या लोखंडी दरवाज्यावर पांढ-या खडूने ‘दुबे गुरुकुल’ लिहले होते. तो दरवाजा खाडकन उघडला. खादीच्या कडक पायजमा व कुर्त्यातील उंचापुरा बळकट शरीरयष्टीचा एक ७३ वषांचा तरूण उभा होता. हो, मीच बिहारीलाल दुबे, हर्षदाचा कोच. आणि हे माझे गुरुकूल. २० बाय २४ च्या जागेत चारही बाजुने विटांच्या भिंती व वरती पत्र्याचे शेड. तिथेच वेटलिफ्टींगचे साहित्य, वारबेलचे सेट, डंबेल्स व व्यायामाचे इतर साहित्य. ऐवढ्या तोडक्या जागेत किती मुले-मुली सराव करतात, असे त्यांना विचारले. तर दुबे म्हणाले, २४ मुले-मुली आहेत. एवढे बोलत असतानाच शेडच्या गरम पत्र्यामुळे १० मिनिटेही गुरुकूलमध्ये थांबू वाटेना, मग ही मुले कशी सराव करीत असतील. एका वेळी सराव करता येत नाही म्हणून आम्ही सकाळी व सायंकाळी त्यांचा सराव घेतो, असे सहज दुबे यांनी सांगितले.
अडचणींचा पाढा वाचण्यापेक्षा पर्यायी मार्ग काढून ही मुले सराव करतात. इथे ॲथलेटिक्स व वेटलिफ्टींगचा सराव करून घेतला जातो. ही जागा अपुरी पडते. तसेच मावळ तालुक्यात कुठेही ४०० मीटरचा एकही ट्रॅक नाही. त्यामुळे मुले महामार्गाच्या बाजुने, डोंगरावर अथवा नदीच्या कडेने धावण्याचा सराव करतात. त्यानंतर ते गुरुकुलमध्ये येतात. पावसाळ्यात गुरुकुलच्या गळक्या पत्र्यातून पाणी येऊ नये म्हणून त्यावर प्लॅस्टीकचा जाड कागद अंथरलेला दिसला. तो उडून जाऊ नये म्हणून पुन्हा एका रस्सीला दोन्ही बाजुने विटा बांधून त्या पत्र्यावर सोडल्या होत्या. आत उजेडासाठी छोटे बल्ब आहेत. त्याचे लाईट बील स्वत: दुबे भरतात.
मूळ गाव उत्तर भारतातील. रोजगारासाठी आलेल्या दुबे सहा पिढ्यापासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. वडील कुस्तीगीर आणि शिक्षक होते. त्यामुळे दुबे यांनाही लहानपणापासून कुस्ती व कबड्डीची आवड लागली. मात्र, बाहेरुन आलेला पेहलवान असल्याने कुस्तीतील राजकारणाला ते कंटाळले. मग, ते वेटलिफ्टींगकडे वळले. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये असताना सिनीअर वेटलिफ्टर डॉ. मधुसूदन झंवर यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे ऑल इंडिया विद्यापीठाच्या स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. पुढे कौटुंबिक जबाबदारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नोकरी करीतही वेटलिफ्टींगचा छंद जोपासला. वडगावातील ग्राम देवतेच्या भटारखान्यातील १० बाय १० च्या खोलीत चार मुलांना घेऊन सराव सुरू केला. त्या मुलांना जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळाले की, त्यांचा गावाच्या मध्यवर्ती असलेल्या मंदिरात जाहीर कार्यक्रम घेऊन सत्कार करायचा. त्यामुळे इतर मुलांना व पालकांना ही प्रोत्साहन मिळू लागले.
सरावासाठी मुले वाढू लागल्यानंतर गावातच मित्रमंडळींनी मिळून १९८० ला फ्रेंडस जिमखाना सुरू केला. तिथेही मुलांची गर्दी होऊ लागल्याने जागा कमी पडू लागली. अखेर १९९८ ला दुबे यांनी स्वत:च्या जागेत भिती ओढून पत्राशेड उभारले. जिल्हा बॅंकेतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या फंडाचे पैसे त्यासाठी वापरले. साहित्य खरेदीसाठी काही अनुदान जिल्हा परिषदेकडून मिळाले. आता साहित्यांचा मेटेन्सससाठी चार ते पाच वर्षांपासून मुलांकडून ३०० रुपये फी घेतली जातेय. पण काही वेळा मुलांच्या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती नसेल, तर दुबे पदरमोड करून मुलांना स्पर्धेसाठी घेऊन जातात. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलांना मार्गदर्शन करण्याची त्यांची जिद्दी त्यांच्या समर्पण भावनेतून जाणवते.
एका वडगावात शेकड्याने नॅशनल चॅम्पियन...
हर्षदाप्रमाणेच या गावाच्या पंचक्रोशीत किमान शेकड्याने मुले-मुली ॲथलेटिक्स व वेटलिफ्टींगचे नॅशनल चॅम्पियन आहेत. ही सर्व कमाल आहे. २० बाय २४ च्या पत्राशेडमधील दुबे गुरुकुलची. वेटलिफ्टींगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वाॅरबेल सेट उचलल्यानंतर खाली टाकला जातो. परंतु, इथे पत्र्याच्या शेडमध्ये खाली फरश्या फुटण्याच्या भितीने ते बाजुच्या दोघांकडून कॅच केले जातात. शिवाय एक सेट चार लाख किंततीचा. तो तुटला तर नवीन कोठून आणयचा हा प्रश्न आहेच. अशा खडतर परिस्थितीत दुबे गुरुकुलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत.
माझ्या सुवर्णभरारीत आई-वडीलांइतकाच वाटा दुबे सरांचा आहे. त्यांनी सराव करताना केलेले मार्गदर्शन मी आत्मसात केले. त्यामुळेच मी यशाला गवसणी घालू शकले.
-हर्षदा गरूड, सुवर्णपदक विजेती
“वडगावात अद्यायावत ट्रेनिंग सेंटर नाही, तरीही जागतिक दर्जाची खेळाडू तयार होते. आम्हाला एक अद्यायावत ट्रेसिंग सेंटर द्या, जोपर्यंत माझे हातपाय चालत आहेत. तोपर्यंत एकच नाही, तर हर्षदा सारख्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या शेकड्याने मुली मी देशाला देईन.”
- बिहारीलाल दुबे, प्रशिक्षक, दुबे गुरुकुल, वडगाव मावळ, पुणे. (आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या हर्षदा गरुडचे कोच)