नादुरुस्त वीजवाहिनीमुळे पेठांमध्ये भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 05:06 AM2017-09-25T05:06:56+5:302017-09-25T05:07:00+5:30
महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ
पुणे : महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ व रविवार पेठच्या परिसरात रविवारी सायंकाळी उशिरानंतर प्रत्येकी
एक तासाचे भारनियमन करण्यात आले.
दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेली महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळपर्यंत ७५ टक्के पूर्ण झाले होते. वीजवाहिनीला चारपैकी तीन ठिकाणी जाईंट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे तर एक जॉईंट लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.
नादुरुस्त वीजवाहिनीचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत किंवा सोमवारी दुपारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर महापारेषणच्या रास्ता पेठ १३२ केव्ही जीआयएस उपकेंद्राचा व तेथून सद्यस्थितीत बंद असलेल्या महावितरणच्या सहा उपकेंद्रांचाही वीजपुरवठा सुरू होईल. त्यानंतर इतर उपकेंद्रांतून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू असलेल्या पुणे शहरातील सर्व पेठांसह लूल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी,
लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केट यार्ड, स्वारगेट या परिसराचा वीजपुरवठा सहा उपकेंद्रांतून पूर्ववत करण्यात येईल़