संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 05:37 PM2020-04-04T17:37:59+5:302020-04-04T18:04:50+5:30
संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स....
पुणे: कोरोनामुळे लादण्यात आलेल्या संचारबंदीचे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. शारीरिक हालचाल बंद आणि खाणे जास्त होऊ लागल्याने वजन वाढले जात अनेकांसमोर ही समस्या निर्माण होत आहे.
फिटनेस तज्ञ मनाली मगर : व्यायाम म्हणजे काही कष्टकरी क्रिया असा अनेकांचा समज आहे. मात्र अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो, ते कमी होत नसले तरी वाढतही नाही व आताच्या काळात त्याचीच गरज आहे.
* काय करावे: सकाळी ऊठताना पटकन ऊठून कामाला लागू नका. शांतपणे बसा, कायकाय करायचे आहे त्याणी मनातच यादी करा. याने मन शांत होईल
आवरून झाले की मांडी घालून स्वस्थ बसा. एक नाकपूडी बंद करायची, दीर्घ श्वास घ्यायचा व दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. एरवी आपण श्वास खोलपर्यंत जाऊच देत नाही. यात तो थेट पोटापर्यंत जाऊ द्यायचा व नंतरच सोडायचा. असे किमान २७ वेळा करायचे. मन शांत होईल
यानंतर सूर्य नमस्कारासारखा व्यायाम किंवा अगदी शाळेत शिकला असाल ती पीटी केली तरी चालेल, मात्र त्यात नियमितता हवी. शरीराला काही एक ताण पडायला हवा. रोजच्या कामांमधून महिलांना हा व्यायाम होऊ शकतो, पण पुरूषांचे तेही होत नाही. त्यामुळे रोजचे चालणे, काही कामे करणे यातूनही व्यायाम होईल. अधिक ताण द्यायचा तर जीम करायला हवे किंवा व्यायाम प्रकार वाढवायला हवे.
.....................................................
आहारतज्ञ विभूषा जांभेकर:
घरात बसून जास्त.खाल्ले जाते, नको तेच खाल्ले जाते व त्यातून वजन वाढते. या काळात खाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे आहे, तरच वजन नियंत्रणात राहू शकते.
* काय करावे: रोजच्या जेवणातील किमान ४० टक्के आहार हा कच्चा असावा. म्हणजे वाफवलेली कडधान्ये, इतकेच नाहीतर गाजर, काकडी, सँलड अशा गोष्टीही कच्च्याच खाव्यात.
खाताना कधीही टीव्ही मोबाईल याचा वापर करू नये. पोट भरले.हा संदेश मेंदूपर्यंत जाण्याच्या क्रियेत यामुळे अडथळा येतो व त्यातून खाणे वाढते.
* शरीराला हालचाल नाही तर साखर शक्यतो आहारात येऊच देऊ नये. गोडाची आवडच असेल तर खजूराचा किस, खारकेची पूड अशी नैसर्गिक साखर खावी.
तेलकट, तळलेले, ब्रेड, पाव याचा अतिरेक टाळला नाही तर वजन वाढणारच हे नक्की आहे. त्यामुळे या गोष्टी आहारात नकोच. त्याऐवजी सर्व कडधान्याची मिसळ, त्यावर कांदा लिंबू किंवा बाजरी ज्वारी यालाही मोड येतात, ते भिजवून त्याची खिचडी असे पदार्थ करावेत.
* दोन वेळा जेवण, दोन वेळच्या खाण्यात किमान ६ तासांचे अंतर या लहानलहान गोष्टींमधूनही वजन आटोक्यात ठेवणे शक्य आहे असा विश्वास जांभेकर यांनी व्यक्त केला.