राहूबेट भारनियमनाने त्रस्त
By admin | Published: May 4, 2017 01:49 AM2017-05-04T01:49:08+5:302017-05-04T01:49:08+5:30
राहूबेट (ता. दौंड) परिसरात रात्री-अपरात्री होत असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या लपंडावाने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून
पाटेठाण : राहूबेट (ता. दौंड) परिसरात रात्री-अपरात्री होत असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या लपंडावाने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून, सद्य:स्थितीत ‘पाणी उशाला, परंतु कोरड घशाला’ याप्रमाणे भीमा आणि मुळा-मुठा या दोन्ही नद्या पाण्याने भरून वाहत असूनदेखील हिरवीगार उभी पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी महावितरणकडून या संदर्भात उपाययोजना करण्यासाठीची मागणी शेतकरी करीत आहे.
राहूबेट परिसरातील पाटेठाण, पिलाणवाडी, कोरेगाव भिवर, देवकरवाडी, खामगाव, वाळकी, वडगाव बांडे,पानवली, राहू, डुबेवाडी, टेळेवाडी, मिरवडी, मेमाणवाडी,टाकळी भीमा, उडंवडी, पिंपळगाव आदी गावांत कृषी विद्युत पंपांना सध्या महावितरणकडून भारनियमन कालावधीत आठ तास वीज उपलब्ध करून दिली जात आहे.
परंतु, रात्री साडेदहाला येणारी लाइट साडेबारा-एक वाजेपर्यंत हुलकावनी देत आहे. तोपर्यंत शेतकरीवर्गाला ताटकळत वाट पाहण्याची वेळ येत आहे. तसेच, लाइट आल्यानंतरदेखील तासन्तास सारखाच लपंडाव सुरू असून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे आठ तास मिळणारी वीज जेमतेम पाच तासांवर आली आहे. परिणामी रात्री उशिरापर्यंत जागृत राहून पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
यातच उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागत असल्याने सध्या तरकारी सारखी पिके देखील पाण्याअभावी सुकून जात आहे. नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध असूनदेखील केवळ विजेच्या वेळीअवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे उसाची उभी हिरवीगार पिके जळून चालली आहेत.
परिणामी होत असलेल्या विजेच्या भारनियमनाबाबतीत महावितरणकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)
भारनियमन रात्री-अपरात्री होत असून, रात्री साडेदहाला येणारी लाइट साडेबारा-एक वाजता येत आहे. आल्यानंतरदेखील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, रात्री जागूनदेखील पिके पाण्या अभावी जळून चालली आहेत.
- सत्यवान वडघुले, शेतकरी पाटेठाण
सद्य:स्थितीत संपूर्ण राज्यातच विजेच्याबाबतीत मागणी जास्त व पुरवठा कमी होत असून, काही तांत्रिक अडचणींमुळे तातडीचे भारनियमन करावे लागत असून वारंवार खंडित होत असलेल्या उपकेंद्राची तत्काळ पाहणी करण्यात येऊन उपाय योजण्यात येतील.
- डी. एन. भोळे, कार्यकारी अभियंता, केडगाव विभाग