पाकिस्तानवरील कारवाईचे शहरामध्ये जल्लोषात स्वागत
By admin | Published: September 30, 2016 04:56 AM2016-09-30T04:56:38+5:302016-09-30T04:56:38+5:30
भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकव्यात काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे
पुणे : भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकव्यात काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे स्वागत करून शहरातील राजकीय पक्षांसह युवकांनी आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला. शहरातील अनेक चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी साखर तसेच पेढे वाटले, तर अनेकांनी देशभक्तीच्या घोषणा देत या कारवाईची व्याप्ती आणखी वाढविण्याची मागणी केली आहे. या वेळी चौकाचौकांत जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’च्या जोरदार घोषणा दिल्या. डेक्कन चौक, नळस्टॉप चौक, हिंगणे चौक, स्वारगेट चौक, संत कबीर पोलीस चौकी, महात्मा फुले मंडई, बालगंधर्व चौक येथे युवकांनी जल्लोष केला.
उरी येथील भारतीय ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट करण्याची कारवाई भारतीय सैन्याने केली आहे. पतित पावन संघटनेच्या वतीने नळस्टॉप चौकात नागरिकांना साखरवाटप आणि फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरप्रमुख सीताराम खाडे, मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पू टेमघरे, दिनेश भिलारे, विनोद चौधरी, सौरभ पवार, अजय घारे, उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संत कबीर पोलीस चौकी आणि महात्मा फुले मंडईच्या परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी पेढे आणि साखर वाटप करण्यात आले. शिवसेनेचे विभागप्रमुख दत्ता जाधव, अजय परदेशी, अच्युतराव वाबळे, सुमीत जाधव यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाल महालासमोर साखर वाटून जल्लोष करण्यात आला. या वेळी राष्ट्रध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी देशभक्तिपर घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
शहरात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अल्पसंख्याक संस्थांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या कारवाईचे स्वागत करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. तीत उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मेमन, हाजी गुलाम मोहंमद, आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नवर पीरभॉय, महाराष्ट्र मेडिकल रिसर्च फाउंडेशन डॉ. अरीफ मेनन, अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी, मुस्लिम ओबीसी संघटनेचे नासीर खान, शब्बीर आतार, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे शाहीद इनामदार या वेळी उपस्थित होते. सिंहगड रस्त्यावर हिंगणे चौकात राजकीय पक्षांच्या वतीने साखर वाटण्यात आली. या वेळी चौकात देशभक्तिपर गीते लावण्यात आली होती. नागरिकांनीही या जल्लोषात सहभागी होऊन देशभक्तिपर घोषणा दिल्या.
सूचनाफलक गजबजले : शहरातील चौकाचौकांमध्ये असलेल्या मंडळाचे सूचनाफलकही दुपारनंतर भारतीय लष्कराच्या सामर्थ्यांचे गुणगाण करणाऱ्या कवितांनी तसेच देशभक्तीच्या घोषणांनी गजबजलेले पाहायला मिळाले. तर अनेक ठिकाणी हा हल्ला आणखी तीव्र करून पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी संदेशाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करण्यात आली.