देहूत मंदिरे उघण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत, पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 09:56 PM2020-11-14T21:56:41+5:302020-11-14T21:57:20+5:30
Dehu News : महामारीमुळे (कोवीड 19) मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन राज्यातील सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद केली होती. त्यानंतर जुन जुलै महिन्यातील पालखी सोहळा हा रद्द करत केवळ मोजक्याच लोकांमध्ये फक्त पादुका पंढरपूरला नेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
देहूगाव- मार्च महिन्यापासुन महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे दिवाळी पाडव्याचा मुहुर्तावर सोमवार (ता. 16) पासुन उघडण्याचा निर्णयाचे श्री क्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरा समोर महाद्वारात सायंकाळी सहाच्या सुमारास पेठे वाटून व फटाके वाजवुन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, ग्रामस्थ व वारकरी यांच्यासह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते.
महामारीमुळे (कोवीड 19) मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन राज्यातील सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद केली होती. त्यानंतर जुन जुलै महिन्यातील पालखी सोहळा हा रद्द करत केवळ मोजक्याच लोकांमध्ये फक्त पादुका पंढरपूरला नेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे समस्थ वारकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यानंतर राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते, सर्व व्यवसायही सुरू केले होते. त्यामुळे कोरोनाचे कारण देत मंदिरे मात्र बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत वारकऱ्यांसह भाजपानेही आंदोलने करीत मंदिरे उघडण्याची मागणी केली होती.
सध्या राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने काही अटीघालत मंदिरे उघण्याचा निर्णय जाहिर केल्याने श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळासह ग्रामस्थ, व्यवसायीक व वारकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. हा आनंद देहूकरांनी पेढे वाटून व दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची आतषबाजी करीत आपला आनंद व्यक्त केला आहे. असे असले तरी प्रत्यक्ष मंदिर उघडण्यासाठी सोमवार पर्यंत भाविकांना वाट पाहवी लागणार आहे.