महाराजांचे वंशज म्हणून स्वागत, पण समाजाने मानले तर ‘खरे महाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:05+5:302021-06-04T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दौरा करणे यातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. महाराजांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दौरा करणे यातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. महाराजांचे वंशज म्हणून स्वागत आहे. महाराज आहात म्हणून तुम्हाला खासदारकी मिळाली. पण समाजाने मानले तर खरे महाराज,” या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे यांच्यावर टीका केली.
“मराठा आरक्षणासाठी रायगडावर जाऊन आंदोलनाची सुरुवात केली तर ते कोण पाहणार? संभाजी महाराजांमध्ये ती धमक नाही. वातावरण चेतवायलासुध्दा धग लागते,” असे राणे म्हणाले. दरम्यान, महाराज म्हणून त्यांना खासदारकी मिळाली. आता मुदत संपत आल्यावर मराठा समाजासाठी वेळप्रसंगी राजीनामा देण्याच्या गोष्टी करणे योग्य नसल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. गुरुवारी (दि. ३) ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
“फडणवीस सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळू लागले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले. मुळातच ठाकरे सरकारला आणि शिवसेनेला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. शिवसेनेने पहिल्यापासूनच आरक्षणाला विरोध केला. आज देशातल्या १२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारकडून केवळ राजकारण केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास केवळ राज्य सरकारच जबाबदार आहे,” असे राणे म्हणाले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने आता तरी बोलले पाहिजे, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.
चौकट
पटोलेंनी कुवत पाहून बोलावे
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली क्षमता, कुवत व लायकी पाहून बोलावे. काँग्रेस पक्ष आता संपत चालला आहे. नेतृत्वहीन पक्षाला लायकी नसलेला प्रदेशाध्यक्ष मिळाला,” असे नारायण राणे म्हणाले.
---------------------------