जंकफूड बंदीचे पालकांकडून स्वागत

By admin | Published: May 11, 2017 04:45 AM2017-05-11T04:45:01+5:302017-05-11T04:45:01+5:30

शाळांमध्ये जंकफूड विक्रीला बंदी घालण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. मात्र, याबाबत थेट बोलण्यास

Welcome to Junk Food Ban | जंकफूड बंदीचे पालकांकडून स्वागत

जंकफूड बंदीचे पालकांकडून स्वागत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळांमध्ये जंकफूड विक्रीला बंदी घालण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. मात्र, याबाबत थेट बोलण्यास जंकफूडची विक्री होणाऱ्या काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधून जंकफूडची विक्री करण्यास बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला आहे. या आदेशामध्ये शाळेतील उपाहारगृहांमधून अशा पद्धतीने वडापाव, पिझ्जा, बर्गर, चिप्स, सामोसे, शीतपेये अशा विविध जंकफूड ठेवण्यास किंवा त्याची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंकफूड हितावह नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये अशी उपाहारगृहे असून, त्यामध्ये सर्रासपणे जंकफूडची विक्री केली जाते. तसेच शाळांमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्येही सर्रासपणे विद्यार्थ्यांना जंकफूड दिले जाते. त्यावर आता बंधने येणार आहेत.
याविषयी बोलताना पालक दत्तात्रय पवार म्हणाले, की शाळांमध्ये जंकफूड विक्रीस मनाईच असायला हवी. पोद्दार शाळेमध्ये पूर्वी उपाहारगृहात वडे किंवा इतर तळलेले पदार्थ दिले जात होते. शाळा सुरू झाल्यानंतर हे उपाहारगृह पुन्हा सुरू झाल्यानंतर जंकफूड विक्री करू नये अशी अपेक्षा आहे. याबाबत पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढे यायला हवे. पालक रोहिणी कांबळे यांनीही जंकफूडच्या निर्णयाचे स्वागत केले. जंकफूड मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक नाही. शाळांकडून विद्यार्थ्यांना पोषण मिळणारे पदार्थ देणे आवश्यक आहे. शाळेमध्ये उपाहारगृह नसले तरी विविध कार्यक्रमांमध्येही असे पदार्थ टाळायला हवेत. लहान मुलांना शाळेत जे काही समोर दिसते ते खाण्याची इच्छा होते. त्यामुळे विद्यार्थी याचा हट्ट करतात. पालकांकडूनही नकळतपणे मुलांचा हा हट्ट पूर्ण केला जातो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये असे प्रकार अधिक दिसून येतात. आरोग्याच्या दृष्टीने जंकफूड खाणे योग्य नसल्याने शाळांकडून काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालक अजय वाबळे यांनी सांगितले. दरम्यान, ज्या शाळांमधील उपाहारगृहांमध्ये जंकफूडची विक्री होते, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. शासन निर्णय पाहून उपाहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीबाबत तसेच विविध कार्यक्रमांमध्येही जंकफूड न देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे एका मुख्याध्यापकाने सांगितले.

Web Title: Welcome to Junk Food Ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.