कोपर्डीच्या निर्भयाला ‘न्याय’, न्यायालयाच्या निर्णयाचे विविध संस्था, संघटनांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:49 AM2017-11-30T03:49:17+5:302017-11-30T03:49:29+5:30
कोपर्डीतील दुर्दैवी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे पुण्यातील विविध संस्था संघटनांनी स्वागत केले आहे.
पुणे : कोपर्डीतील दुर्दैवी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे पुण्यातील विविध संस्था संघटनांनी स्वागत केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, त्यामुळे गुन्हेगारांना जरब बसेल, अशी मागणी विविध संघटनांतर्फे करण्यात आली.
अत्याचार निंदनीय
कोपर्डीचा खटला अनेक कारणांनी संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. आपल्याकडे गेली काही वर्षे बलात्कार, स्त्रियांवर होणाºया अत्याचाराविषयी आता आवाज उठवला जात आहे. बलात्कार पूर्ण देखील होत होते, पण आता याबाबत वेगवेगळ्या स्तरातून आवाज उठविला जात असल्याने मोठ्या प्रमाणात अशा घटना समोर येऊ लागल्या, ही चांगली बाब आहे. समाजाच्या दबावामुळे कोपर्डी खटल्याचा निर्णय तातडीने लागला व आरोपींना शिक्षादेखील झाली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोपर्डी प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी एक मोठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला; परंतु कोणत्याही जातीच्या स्त्रीवर, कोणीही जरी अत्याचार केला तर तो निंदनीय आहे, असे चित्र समोर येणे अपेक्षित होते. एक समाजशास्त्रज्ञ म्हणून आमच्या जातीच्या महिलांवर अत्याचार केला तर आता बघून घेऊन, ही बाब चिंताजनक आहे.
-श्रुती तांबे, समाजशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठ
ग्रामरक्षकदल हवे
कोपर्डी अत्याचार प्रकरणी दोषी ठरविलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याबद्दल न्यायालयाचे स्वागत आहे. या निकालामुळे या घटनेतील पीडित मुलगी, तिचे कुटुंबीय आणि राज्यातील असंख्य पीडित महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे. पोलीस यंत्रणेकडून अशाप्रकारच्या केसेसची हाताळणी अतिशय संवेदनशीलतेने केली जावी. जेणेकरून पीडित व्यक्तींच्या नातेवाइकांना मनस्ताप व मानसिक त्रास होणार नाही; तसेच अत्याचार पीडित महिला व मुलींची रुग्णालयात गेल्यावर वैद्यकीय तपासणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हावी. राज्याच्या ग्रामीण भागात सर्व जिल्ह्यांच्या तालुक्यात ग्रामरक्षक दलांची स्थापना करण्यात यावी. - डॉ. नीलम गोºहे, आमदार
विकृती दूर होणे गरजेचे
कोपर्डी घटनेचा निकाल अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला असला, तरी आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय ही सर्व प्रक्रिया बाकी आहे. कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा दिल्यानंतर, सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असला, तरी अशा घटनांचा खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. मराठा मोर्चाच्या दबावामुळे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आला. मात्र, अशा प्रत्येक खटल्यामध्ये न्याय मिळत नाही. मुळात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी समाजातील विकृती दूर होणे गरजेचे आहे. - अॅड. शैलजा मोळक
कोपर्डी खटल्याकडे मीडियासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे लवकरात लवकर निकाल लागणे महत्त्वाचे होते. पॉक्सोच्या कायद्यानुसार एक वर्षात निकाल लागणे अपेक्षित असते. रेअरेस्ट आॅफ रेअर केस म्हणून न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मी व्यक्तिश: फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आहे; कारण फाशीची शिक्षा सुनावल्याने समाजात दहशत निर्माण होईल, असा समज आहे. प्रत्यक्षात समाजातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे सिद्ध झालेले नाही. तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण वाढले असले तरी दोष सिद्ध होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नाही. लोकांच्या न्यायप्रक्रियेवरील विश्वास कायम राहावा असे वाटत असेल, तर सर्व खटल्यांचा जलद गतीने निकाल लागणे अपेक्षित आहे. न्यायालय, पोलीस अशा सर्व यंत्रणांमध्ये समन्वय वाढणे गरजेचे आहे.
- अॅड. रमा सरोदे
कोपर्डी निर्णयाचे स्वागत
पुणे : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दलित पँथरच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निर्णयाचे स्वागत केले. या वेळी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे, शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष शुभम सोनवणे, आरती बाराथे, बबिता खान, सोनाली धुंनगव, मुनिरा थानावाला, रुबिना शेख, सुषमा कांबळे, लक्ष्मी सरोदे यांच्यासह पँथर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होेते.
आता शिक्षेची अंमलबजावणी व्हावी
मानवतेला कलंकित करणाºया कोपर्डी येथील घटनेचा आज निकाल लागला. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे होते. अॅड. उज्ज्वल निकम यांनी अतिशय धडाडीने हा खटला चालवला आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. या निकालामुळे पीडित मुलीला व कुटुंबीयांना न्याय मिळाला. बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय आहे; मात्र आता या निकालाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. जेणेकरून स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणाºया मनोवृत्तीला जरब बसेल आणि अशा वाईट गोष्टी करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही.
- डॉ. उषा काकडे,
अध्यक्षा, यूएसके फाउंडेशन
कठोर शिक्षा करा
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असे वाटत होते. त्या तिघांनाही फाशी झाले हे चांगले झाले. महिलेकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास किंवा कोणतेही वाईट कृत्य केल्यास कडक शिक्षा होऊ शकते, असा समाजामध्ये एक चांगला संदेश पोहोचेल. - मेधा कुलकर्णी, आमदार
लोकशिक्षणाची गरज
न्यायालयाने कोपर्डी अत्याचार प्रकरणी दिलेल्या निकालाचे स्वागत आहे. पीडित मुलीला न्याय मिळायलाच पाहिजे होता; मात्र अशा प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा देऊनही समाजातील बलात्काराच्या घटनांना आळा बसेल असे वाटत नाही. आज पुरुषप्रधानता वेगवेगळ्या प्रकारे वाढत चालली आहे. बºयाचशा बलात्काराच्या घटना या नोंदविल्याच जात नाहीत. उलट अशा वाढत्या घटनांमुळे मुलींवरच अधिकाधिक बंधन लादली जात आहेत. महिलांची सुरक्षितता व सन्मानाचा प्रश्न उभा ठाकला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखायच्या असतील, तर लोकशिक्षणाची गरज आहे.
- लता भिसे, राज्य सचिव
भारतीय महिला फेडरेशन
ठोस पावले उचलावित
कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना फाशी हा निर्णय अपेक्षितच होता. सर्वोच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा रेअरेस्ट आॅफ रेअर केसमध्ये व्हावी, अशी संकल्पना मांडली होती. कोपर्डी घटनेत निरपराध मुलीवर झालेला बलात्कार आणि खून हे या कक्षेत बसत असल्याने नराधमांना ही शिक्षा ठोठावणे योग्यच आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो; परंतु गेलेल्या जिवामुळे कुटुंबीयांच्या जीवनात निर्माण झालेले दु:ख आणि पोकळी भरून येणार नाही. अशा प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा अजूनही दुष्कृत्य करणाºया नराधमांमध्ये भीती निर्माण करत नाही, ही गंभीर बाब आहे. असे कृत्य घडू नये, यासाठी शासन अजूनही ठोस पावले उचलत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
- वंदना चव्हाण, खासदार