गुलाबी थंडीत नयनरम्य फटाक्यांच्या आताषबाजीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 11:56 AM2019-01-01T11:56:26+5:302019-01-01T12:03:28+5:30
रात्री बाराच्या ठोक्याला काही क्षण सर्व जण स्तब्ध झाले आणि घड्याळाचा काटा जसा बारावर पोहचला़ त्याबरोबर हॅपी न्यू इयरचा एकच गजर करीत तरुणाईने मोठा जल्लोष केला़
पुणे: रंगीबेरंगी बदामी आकाराचे फुगे, ख्रिसमसच्या लाल टोप्या तसेच कानटोपी, घमघमीत व गरमागरम खाद्यपदार्थचा आस्वाद, कडाक्याची थंडीत ऊबदार जॅकेट , स्वेटर घालून पुणेकरांनी नववर्षाचे जल्लोषपूर्ण व उत्साहात स्वागत केले. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कॅम्पमधील महात्मा गांधी रस्ता, टिळक रस्ता अशा मुख्य रस्त्यावर तरुणाईच्या सेलिब्रेशनला उधाण आले होते़.
रात्री बाराच्या ठोक्याला काही क्षण सर्व जण स्तब्ध झाले आणि घड्याळाचा काटा जसा बारावर पोहचला़. त्याबरोबर हॅपी न्यू इयरचा एकच गजर करीत तरुणाईने मोठा जल्लोष केला़.
सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावरील अनेक चौकात आणि सिग्नलवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करत होते़.
सायंकाळीच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर रंगबेरंगी लाल, निळ्या रंगाचे फुगे दिसून येत होते. तर एलडीच्या लाईटच्या फुगे हे नवीन वर्षाच्या स्वागताचे आकर्षण वाटत होते. तरुणाईने पूर्ण रस्ता भरभरून गेला होता. रस्त्याच्या फुटपाथवर फुगे, पिपाणी , ख्रिसमस टोप्या, छोट्या बाहुल्या घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तरुण मुले व मुली नववर्षाच्या आनंदात पिपाणी वाजवण्याचा आनंद घेत होती.
रस्त्यावर असणाऱ्या झाडांना लाईटच्या गजराचे डेकोरेशन करण्यात आले होते. आकर्षक लाईटच्या माळा झाडांना शोभून दिसत होत्या. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या दोन रस्त्यावर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या रस्त्यावर असणाºया कट्ट्यावर जोडपी, मित्र मैत्रिणी बसून चहा, कॉफी पिण्याचा आनंद घेत होते. तर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण सेल्फी काढण्यात दंग झाले होते. फोटोग्राफीची नवीन क्रेझच दिसून येत होती़ फुगे विक्रेत्यांकडून फक्त फोटो काढण्यासाठी तरुणाई फुगे घेत होती. प्रमुख रस्त्यावरील हॉटेल गर्दींनी ओसडून वाहत होती़ अनेक नागरिक वेटिंग ला थांबले होते.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणाई कडून व इतर नागरिकांकडुन हुल्लडबाजीचे प्रमाण कमी होते. सर्व लोक पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होताच. नववर्षाचे स्वागत करणाऱ्या तरुणाईला पोलीस मार्गदर्शन करत होते़. त्याचवेळी कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करताना दिसल्यास त्याला बाजूला घेऊन त्यांची चौकशी केली जात होती़.
़़़़़
उपनगरातही गर्दी
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहराच्या बाहेर चांदणी चौक, खडकवासला, बावधन, उपनगरांमध्ये तरुणतरुणाई घोळक्याने जमले होते़ चांदणी चौकात तरुणाईची मोठी गर्दी झाली होती़ तेथील हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले़ शहरातील पंचतारांकित हॉटेलमधून नववर्षांनिमित्त पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते़