आतषबाजीने नववर्षाचे स्वागत

By admin | Published: January 1, 2017 04:43 AM2017-01-01T04:43:38+5:302017-01-01T04:43:38+5:30

सरत्या वर्षाला निरोप अन् एकमेकांना शुभेच्छा देऊन नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातील काही भागात गाणे

Welcome to New Year's Eve by Fireworks | आतषबाजीने नववर्षाचे स्वागत

आतषबाजीने नववर्षाचे स्वागत

Next

पुणे : सरत्या वर्षाला निरोप अन् एकमेकांना शुभेच्छा देऊन नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातील काही भागात गाणे लावून तरुणाई थिरकताना दिसली; तसेच रात्री बाराच्या ठोक्याला रस्त्यावर उतरत दुचाकीवरून फेरफटका मारत तरुणाईने एकच जल्लोष केला. पहाटेपर्यंत जागे राहून नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत केले.
नागरिकांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षातील घटनांना उजाळा देत नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. त्यातही तरुणाईचा जल्लोष शिगेपर्यंत पोहोचला होता. क्लब, पब, हॉटेल्स आणि ढाब्यावरून तो ओसंडून वाहत होता. काहींनी नूतन वर्षाच्या स्वागताची तयारी आठवड्याभरापासून सुरू केली होती, तर काही मित्र-मैत्रिणींनी दोनतीन दिवसांपूर्वी नियोजन करून, नववर्षानिमित्त कार्यक्रम आखले.
बऱ्याचशा नागरिकांनी घराबाहेर पडून नववर्षाचे स्वागत केले असले, तरी काहींनी विविध वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहणेच पसंत केले. त्यातही थर्टी फर्स्टच्यानिमित्ताने सकाळपासूनच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नववर्षाच्या स्वागताचे एसएमएस पाठविण्यास सुरुवात झाली होती.
नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत पुन्हा एकदा बोलणार होते. नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकतेचे वातावरण होते.
नोटाबंदीने निर्माण झालेल्या स्थितीचा काहीसा परिणाम थर्टी फर्स्टवर दिसून आला. तसेच, थंडीचा कडाका असल्याने नागरिक गरम कपडे परिधान करून रस्त्यावर फेरफटका मारतना दिसले. नववर्षानिमित्ताने काहींनी नवनवीन संकल्पही केले. सायंकाळी उशिरा सुरू झालेला नववर्षाचा जल्लोष रात्री वाढत गेला.
मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेले. राजकीय कार्यकर्त्यांसह काही संस्थांच्या वतीने नववर्ष स्वागताचे फलकही लावण्यात आले होते. शहरातील विविध संघटनांतर्फे व्यसनविरोध रॅली काढून दुधाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)

पहाटेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये गर्दी
नववर्षानिमित्त घरी जेवण्याऐवजी हॉटेलमध्ये जेवण करण्याचे नियोजन काही नागरिकांनी केले होते. त्यातच गृह विभागाने पहाटे पाच वाजेपर्यंत बार, रेस्टॉरन्ट सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील बार व रेस्टॉरन्टमध्ये एकच गर्दी झाली होती.
नागरिकांना जेवण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. त्यातच पुण्यात प्रथमच काही ठिकाणी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन नववर्ष साजरे केले. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरांतही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

Web Title: Welcome to New Year's Eve by Fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.