संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:14+5:302021-07-20T04:10:14+5:30
इंदापूर : ज्ञानोबा तुकाराम... ज्ञानोबा तुकाराम असा गजर करीत, ४० वारकऱ्यांची दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा क्षेत्र देहू येथून ...
इंदापूर : ज्ञानोबा तुकाराम... ज्ञानोबा तुकाराम असा गजर करीत, ४० वारकऱ्यांची दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाल्यानंतर फक्त इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात काही तासांसाठी विसावला. मेघराजाने पावसाच्या सरीने पालखीरथाचे इंदापूर शहरात आगमन होताच स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल असा जयघोष केला.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा क्षेत्र पंढरपूरकडे सालाबादप्रमाणे यंदाही निघाला. परंतु कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी, काही मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित क्षेत्र देहू येथून फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमध्ये पालखीतील संत तुकाराम महाराज यांच्या मानाच्या पादुका छोट्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा प्रथेप्रमाणे इंदापुरात दाखल झाल्या. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी पालखीतील पादुकांना पुष्प हार घालत, मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, तसेच इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत शहा, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे, बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजेंद्र चौगुले, प्रशांत सिताप, नाभिक महामंडळाचे अवधूत पवार, विकास खिलारे, प्रदीप पवार, नगरसेवक स्वप्नील राऊत, जावेद शेख, शार्दूल ताजणे यांच्यासह शहरातील मानाचे वारकरी उपस्थित होते.
चौकट
इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पालखीरथासाठी शामियाना उभारण्यात आला होता. अत्यंत सुबक रांगोळ्या काढत फुलांची आरास करण्यात आली होती. दुपारी २.४५ वाजता संत तुकोबारायांचा पालखी सोहळा दाखल झाला. पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, माजी पालखी सोहळा अध्यक्ष बाळासाहेब मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित मोरे, प्रल्हाद महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे विधिवत पौरोहित्य करणारे टांकसाळे गुरुजी, शिंगाडवादक पोपट तांबे, मानाचे वारकरी टाळकरी यांचे स्वागत इंदापूर करांच्या वतीने करण्यात आले.
शिवशाही बस पालखीरथ फुलांनी सजवलेला होता. यामध्ये पालखीतील पादुका ठेवण्यात आल्या होत्या. जरी पालखीरथ छोट्या विश्रांतीसाठी इंदापुरात विसावला असला तरी देखील रथातील पादुका रथातच ठेवण्यात आल्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपस्थितांनी सुरक्षित अंतर ठेवून पालखी रथाचे लांबून दर्शन घेतले.
चौकट
इंदापूर शहरात या पालखी सोहळ्याचे पूर्वी दोन मुक्काम असायचे व एक गोल रिंगण, परंतु यामध्ये कालांतराने एकच मुक्काम व मानाचे गोल रिंगण याच मैदानावर रंगत असायचे, यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील भक्तगण हरीचे दास भक्तीच्या वातावरणात तल्लीन व्हायचे. मात्र यंदा किमान पालखीरथ तरी इंदापुरात दाखल झाला. त्यामुळे घराघरातून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळा समवेत आलेल्या वारकऱ्यांना फराळ अन्नदान या वेळी करण्यात आले. तदनंतर ३.३० वाजता पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत क्षेत्र पंढरीकडे मुक्कामासाठी रवाना झाला.
फोटो ओळ : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापुरात विसावला. या वेळी इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मान्यवरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.