Ashadhi Wari 2022: वैष्णवांचा मेळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला; माऊलींचे भंडाऱ्याच्या उधळणीत स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 07:28 PM2022-06-26T19:28:48+5:302022-06-26T21:18:56+5:30
ओव्या आणि टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा जेजुरी मुक्कामी पोहोचला
जेजुरी : सोन्याची जेजुरी, जेजुरी ।
तेथे नांदतो मल्हारी,
माझा मल्हारी, मल्हारी ।।
आलो तुमच्या दारी।
द्यावी आम्हा बेल भंडाराची वारी।।
अशा ओव्या आणि टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा जेजुरी मुक्कामी पोहोचला. सायंकाळी वाजता समाज आरतीने सोहळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला.
आज सकाळी श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा निरोप घेत माऊलींच्या सोहळ्याने कुलदैवत खंडेरायाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण ढगांनी आच्छादलेले आकाश, आल्हाददायक वातावरण, एखाद्या लहानशा पर्जन्यसरी सह ऊन सावलीच्या खेळ याचबरोबर दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळ्या, गौळणी, वासुदेव, आंधळे पांगळे गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे मंगलमय सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते. याच सूर तालात आणि उत्साही वातावरणात सोहळ्यातील अवघे वैष्णवजन झप झप पावले टाकीत मल्हारी मार्तंडाची जेजुरी जवळ करीत होते.
ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरावके मळा येथील न्याहरी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती, त्याचबरोबर साकुर्डे फाटा येथील अल्पविसावा उरकून सोहळा सायंकाळी साडे पाच वाजता मजल दरमजल करीत जेजुरीत पोहोचला.
यावर्षी नव्यानेच उभारण्यात आलेल्या जेजुरी शहराच्या पश्चिमेला ऐतिहासिक होळकर तलावानजीकच्या मुक्काम तळावर हा सोहळा पोहोचला. सायंकाळी ७ वाजता समाज आरतीने माऊलींचा पालखी सोहळा मल्हार नगरीत विसावला. सकाळी पहाटे सात वाजता सोहळा वाल्हे मुक्कामी कूच करणार असल्याचे यावेळी चोपदारांनी सांगितले. आज दिवसभर सोहळ्यातील वारकरी भाविक जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेऊन कुलदैवताची वारीही पूर्ण करीत होते. जेजुरी गडावर ही मोठी गर्दी होती. सासवड जेजुरी सोहळा मार्गावर ठिकठिकाणी विबिध संस्था संघटनांच्या वतीने वैष्णवांना खाऊ वाटप, पाणी वाटप करण्यात येत होते. शासनाच्या आरोग्य विभागासह अनेक स्वयंसेवी संस्थाकडून माऊली भक्तांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्यात येत होत्या. बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती संघटनेकडून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात येत होता.
भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे जेजुरीत स्वागत #Pune#ashadhiwaripic.twitter.com/0y3Vjm4Vm5
— Lokmat (@lokmat) June 26, 2022
जेजुरी नगरपालिकेच्या वतीने पालिकेच्या माजी पदाधिकारी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, रुख्मिनी जगताप, शीतल बयास, वृषाली कुंभार, पौर्णिमा राऊत, मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले आदिंनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सदानंदाचा जयघोषात माऊलींच्या रथावर भांडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आली. मार्तंड देव संस्थांनच्या वतीने ही सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, जिल्हा न्यायाधीश भूषण क्षीरसागर, प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त राजकुमार लोढा, अड् अशोक संकपाळ, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, अड् प्रसाद शिंदे यांनीही माऊलींचे स्वागत केले. दररोज अबीर बुक्यात न्हाऊन निघणारा सोहळा आज जेजुरीत पिवळ्या जर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला.