ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:54 PM2022-06-28T18:54:47+5:302022-06-28T18:55:08+5:30
आभाळभरुन पाऊस पडू दे , रान शिवार फुलू दे भाविकांचे विठूरायाला साकडे
बारामती : कविवर्य मोरोपंतांच्या बारामती नगरीत मंगळवारी(दि २८) सायंकाळी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामी विसावला. यावेळी भजन किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी बारामती भक्तीरसामध्ये न्हाउन निघाली. दोन वर्षानंतर आलेल्या वैष्णवांचे बारामतीकरांनी उत्साहात स्वागत केले.
ज्ञानबा तुकाराम आणि विठुनामाच्या जयघोषाने आज कवि मोरोपंतांची बारामती नगरी दुमदुमली. आभाळभरुन पाऊस पडू दे ,रान शिवार फुलू दे’ माझ्या शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळु दे, अशी मनात आस ठेवत हे वारकरी भाविकांनी आपल्या भोळ्या भक्तीने विठूरायाला साकडे घातले. शहराच्या वेशीवर श्री तुकोबांच्या पालखीचे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण आदी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले.
नगरपालिकेच्या वतीने स्वागत कक्षात पालखीचे स्वागत करण्यात आले. शहरातील शारदा प्रांगणात उभारण्यात आलेल्या शामियानात पालखी सोहळा सायंकाळी विसावला. यावेळी बारामती शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात आरतीसाठी उपस्थित होते. बारामती शहरातील विविध तरुण मंडळांनी अन्नदानाचा उपक्रम राबविला. तसेच चहा,फळेवाटप सह पाण्याच्या बाटल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हुतात्मा स्तंभावर केलेली फुलांची सजावट आणि येथे उभारलेली विठोबाची प्रतिमा सेल्फी पॉईंट ठरली. दरम्यान बुधवारी(दि २९) सकाळी पालखी सोहळा सणसर (ता.इंदापुर) मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. तत्पुर्वी काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ठ्यपुर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडेल.