Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:05 PM2022-06-27T20:05:25+5:302022-06-27T20:05:37+5:30
दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण
उंडवडी : पंढरीच्या वाटेवरील जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि.२७) रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बारामती तालुक्यात प्रवेश केला. सकाळी प्रस्थान ठेवलेल्या सोहळ्याने वरवंड ते उंडवडी सुपे २५ किलोमीटरचा सर्वात लांबचा पल्ला पार केला. तालुक्याच्या शिवेवर गुंजखिळा येथे फुलांची उधळण करत गळाभेट घेत दोन वर्षांनंतर सोहळ्यातील वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याच्या सोबतीला आसंमंतात घुमणारा टाळ - मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, टाळ- मृदुंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर, कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम अशा या वातावरणाने मंत्रमुग्ध झालेल्या लाखो वारकऱ्यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि.२७) रोजी सायंकाळी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी उंडवडी सुपे ग्रामपंचायत हद्दीतील येथील पालखी तळावर विसाव्यासाठी आगमन झाले. यावेळी दर्शनाखाठी आलेल्या शेतकºयांनी पाऊस पडण्यासाठी तुकोबांना साकडे घातले.
गुंजखिळा येथील स्वागत आटोपून पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे सायंकाळी ७.४० ला मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाला. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी (दि २८) सकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे बारामती शहराकडे प्रस्थान होणार आहे.