Video: "काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी", तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:36 PM2022-06-29T17:36:15+5:302022-06-29T17:36:52+5:30
काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्याचे रिंगण पार पडले.
काटेवाडी : काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी ,
पायघड्या धोतराच्या, झाला गजर हरिनामाचा ।
कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी इंदापूर तालुक्यात दाखल झाला. काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्याचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती .
पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळानी मेंढ्याची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्याचे रिंगण घातले होते. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे. धोतराच्या पायघड्या घालून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजता बारामती - इंदापुर रस्त्यावर संभाजी काळे, तात्यासो मासाळ, व महारनवर यांच्या मेंढ्यानी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून मेंढ्या नी रिंगण पूर्ण केले यावेळी उपस्थित भाविकांनी पुंडलिक वरदे हारी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकारामचा... गजर केला या वैशिष्ट्यपूर्ण रिगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
बारामती शहरातून बुधवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर बांदलवाडी, ग्रेप,पिंपळी लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडी त पालखी सोहळा विसावला. वेशीपासुन छत्रपती हायस्कूलच्या लेझीम पथकच्या निनादात, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्याचे स्वागत बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार . उद्योजक रणजित पवार, शरयू फाउंडेशनचे अध्यक्षा शर्मिला पवार, विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त योगेंद्र पवार, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे ,उपसरपंच श्रीधर घुले आदींनी केले.
काटेवाडी येथे तुकोबांच्या पालखी भोवती मेंढ्यांचे रिंगण पार पडले #Pune#AshadhiWari2022pic.twitter.com/84ukoV9mbm
— Lokmat (@lokmat) June 29, 2022