‘मराठा चेंबर’कडून स्वागत आणि चिंताही व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:46+5:302021-04-03T04:10:46+5:30
पुणे : पुणे जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी लागू न केल्याबद्दल मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर (एमसीसीआयए)ने स्वागत केले ...
पुणे : पुणे जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी लागू न केल्याबद्दल मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर (एमसीसीआयए)ने स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी पीएमपी सेवा बंद करणे, शासन निर्णयातील अनिश्चितता या मुद्यांवर तीव्र चिंताही व्यक्त केली आहे.
‘मराठा चेंबर’च्यावतीने अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबने यांनी या संदर्भातील निवेदन शुक्रवारी (दि. २) प्रसिद्धीस दिले.
यात त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात टाळेबंदी न लागू केल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र पीएमपीएमएल बस सेवा बंद केल्याने वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील कामगारांना त्रास होईल. विशेषत: स्वत:ची चारचाकी किंवा दुचाकी नसलेल्या गरीब लोकांना याचा फटका बसेल. ज्या छोट्या कंपन्यांकडे कामगारांसाठी वाहतूक व्यवस्था करण्याची ताकद नसेल त्यांच्यासाठीही हे अडचणीचे आहे.
लसीकरणासाठी प्रवास करणारे रूग्णालयातील कर्मचारी आणि नागरिक यांनाही या निर्णयामुळे फटका बसेल. त्यामुळे या कालावधीत प्रवासी क्षमता आणि सुरक्षेच्या सर्व नियमांची खबरदारी घेऊन पीएमपीएमएल चालू ठेवावी, असे आवाहन ‘मराठा चेंबर’ने केले आहे.
चौकट
‘मराठा चेंबर’ला चिंता
-तीव्र अनिश्चिततेमुळे राज्यातील तसेच परप्रांतीय स्थलांतरित कामगारांवर गदा आली आहे. त्यांच्या गावांपासून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने उद्योग क्षेत्र सावरण्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
-किरकोळ आणि सेवा क्षेत्रावर अंशत: टाळेबंदीचा विपरीत परिणाम होईल. हॉटेल, रेस्टॉरंट आदी आदरातिथ्य क्षेत्र आधीपासूनच न परवडणाऱ्या किमतींमध्ये काम करत आहे.
चौकट
अठरा वर्षांवरील लसीकरण
“केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास परवानगी द्यावी. यामुळे कार्यक्षम वयोगटातील जास्तीत जास्त लोकसंख्या संरक्षित होऊ शकेल आणि देशाचे अर्थचक्र सुरळीत करण्यात ते योगदान देऊ शकतील. या लसीकरणात कोरोना संसर्ग सर्वाधिक असणाऱ्या पुण्यासारख्या परिसराला प्राधान्य देणे आवश्यक आहे.” -एमसीसीआयए