‘हम बच्चों ने ठाना है - कोरोना को हराना है’ घोषणा देत पुण्यात विदुषकानं केलं विद्यार्थ्यांचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:08 PM2021-10-04T19:08:16+5:302021-10-04T19:08:24+5:30
आपल्या पाल्यांच्या या विदूषकांसहच्या आपलेपणाच्या स्वागताने पालकही भारावले होते.
पुणे: ‘पुन्हा एकदा घंटा वाजली - शाळा भरली’, ‘कोरोनाला जाऊ द्या - आम्हाला शाळेत येऊ द्या’, ‘शाळेत नियम पाळू - कोरोनाला टाळू’, ‘शिक्षण घेऊ हसत हसत - कोरोना जाईल पळत पळत’, ‘हम बच्चों ने ठाना है - कोरोना को हराना है’ अशा घोषणा देत पुण्यातील शिवदर्शन येथील राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये विदुषकानं विद्यार्थ्यांचं स्वागत केले. त्यांच्या हातातील फलकांनी सार्यांचेच लक्ष वेधले होते. ठीक सकाळी नऊ वाजता विदूषकांनी शाळेची घंटा वाजवली आणि विदूषकाशी हस्तांदोलन करीत व ‘बाय बाय’ करीत हे शाळकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आपापल्या वर्गात गेले. अनेक पालक विद्यार्थ्याचे विदूषकाबरोबर मोबाईलमधून छायाचित्रही काढत होते. आपल्या पाल्यांच्या या विदूषकांसहच्या आपलेपणाच्या स्वागताने पालकही भारावले होते.
तब्बल दीड वर्षानंतर राज्यात शाळा सुरु झाल्या आहेत. सर्वत्र विद्यार्थ्यांचे गुलाब, भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. पुण्यातही विविध संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिवदर्शन येथील राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये आनंदाने व उत्साहाने येणार्या विद्यार्थ्यांचे चक्क विदूषकांनी स्वागत केले आणि मोठा जल्लोष यावेळी झाला.
विद्यार्थी आत आल्यावर एक विदूषक विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत स्वागत करीत होता. तर दुसरा विदूषक मास्क देत होता. तसेच या शाळेची संकल्पना मांडून त्याची पूर्तता करणारे पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व शिक्षक विद्यार्थ्यांना पेढा व चॉकलेट देत होते. तसेच सॅनिटायझरची बाटलीही दिली जात होती. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने सारे वातावरण भारून गेले होते. या प्रसंगी विदूषक अनेक गंमती करीत होता आणि विद्यार्थी उत्साहाने दाद देत होते. शाळेतील शिक्षक हातात प्ले कार्ड घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत होते.