'खंडू'ने केलं 'अलर्ट' म्हणून सर्पदंशाचा धोका टळला; विद्यार्थ्यांचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:01 PM2021-05-24T18:01:53+5:302021-05-24T18:07:31+5:30
'डेरिंगबाज' खंडूमुळे आजपर्यंत दोनदा सर्पदंशाचा धोका टळला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'तो' सर्वच विद्यार्थ्यांचा लाडका आहे. दरवर्षी विद्यार्थी न चुकता त्याचा वाढदिवस देखील साजरा करतात. आणि का करून नये.. कारण तो ही तितकाच 'डेरिंगबाज' आहे. आजपर्यंत दोनदा त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्पदंशापासून एकदा सुरक्षा रक्षकांचे आणि दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले आहे. दुसरी घटना तर अगदी आजचीच आहे. ही गोष्ट आहे विद्यापीठातल्या खंडू नावाच्या कुत्र्याची..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सोमवारी (दि.२४ ) काही विद्यार्थी एकत्र चर्चा करत बसले होते. त्याचवेळी तिथे खंडू नावाचे कुत्रे अचानक जोरजोरात भुंकू लागले. तरीदेखील विद्यार्थ्यांचं त्याकडे लक्ष नव्हते. मात्र, कुत्र्याचे भुंकणे थांबत नाहीये म्हणून त्यांना काहीतरी धोका असल्याची जाणीव झाली. जागेवरून उठून त्यांनी आजूबाजूला पाहिले तर एक भला मोठा लांब साप त्यांच्या अगदी जवळ आलेला दिसला. काही क्षणात तिथून ते बाजूला झाले. कुत्र्याने भुंकणे चालूच ठेवल्याने नंतर सापाने आपला मार्ग बदलला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेच सर्पमित्रांना बोलावले. काही वेळातच सर्पमित्रांनी या सापाला ताब्यात घेतले. 'खंडू'ने अलर्ट केल्यामुळे सर्पदंशाचा धोका टळला. अगदी काही क्षणांचाही विलंब किती महागात पडला असता याची कल्पना विद्यार्थ्यांना झाली.
कुत्रा आणि माणूस यांच्यातलं नातंच पहिल्यापासूनच खास राहिलेलं आहे. कुत्र्याने वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याचे अनेक उदाहरणे अवतीभोवती पाहायला मिळतात.याचाच अनुभव पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आला.
काही महिन्यांपूर्वी असेच विद्यापीठ परिसरात काही सुरक्षा रक्षक एकत्र जेवण करत बसले होते. जेवताना गप्पात रंगलेल्या सुरक्षा रक्षकांना पुढील धोक्याची कल्पना देखील नव्हती. पण तिथेच असलेल्या खडूं या कुत्र्याने हा धोका ओळखला होता. साप जवळ अगदी काही फुटावर येऊन ठेपला होता. सुरक्षा रक्षकाच्या हाताला दंश करणार एवढ्यात खंडू कुत्र्याने सापावर झडप घालण्यासाठी उडी मारली पण ती सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पडली. त्यामुळे खडबडून उठलेल्या सेक्युरिटी गार्डला जवळच साप असल्याचे दिसले. नंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडले होते.
याबाबत अविनाश शेंबेटवाड म्हणाला, लॉकडाऊन काळात विद्यापीठात विद्यार्थ्यांची गर्दी कमी आहे. शैक्षणिक कामकाज देखील बंद असल्याने वर्ग देखील बंद आहेत.या कालावधीत बऱ्याचदा साप आढळतात. मात्र, खंडू नावाच्या कुत्र्याने दोन वेळा आपला जीव धोक्यात घालून सर्पदंशापासून विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांना वाचविले आहे. खंडू विद्यापीठात सर्वांचा लाडका आहे. त्याच्यावर सर्व विद्यार्थी भरभरून प्रेम करतात.दरवर्षी न चुकता त्याचा वाढदिवस देखील साजरा करण्यात येतो.