विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली
By admin | Published: April 25, 2017 03:57 AM2017-04-25T03:57:36+5:302017-04-25T03:57:36+5:30
शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे
खोडद : शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षीदेखील जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी कडाक्याचा उन्हाळा आणि तापमानात झालेली प्रचंड वाढ, यामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांची काळजी घेता घेता बळीराजाची दमछाक झाली आहे.
त्यातच भर म्हणजे, चालू वर्षी तालुक्यातील विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याने पाण्याअभावी शेतातील टोमॅटो आणि इतर पिके जगविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र गावोगावी पाहावयास मिळत आहे.
सध्या जुन्नर तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्याप्रमाणात खालावत आहे. जमिनीतील पाणी मिळेल, या आशेने शेतकरी दररोज ५० ते ७० ठिकाणी बोअरवेल खोदत आहेत. पण, पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ६०० फूट खोल बोअरवेलसाठी १८,००० ते ३०,००० रुपये खर्च होत आहेत.
पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे बारमाही विहिरी आठमाही झाल्या आहेत. यामुळे विहीर बागायत कमी होऊन बोअरचे प्रमाण वाढले आहे.
या वर्षी हवामान विभागाने, आंतरराष्ट्रीय संस्थांनी मॉन्सून चांगले होण्याचे संकेत दिले आहेत. या सुविधांचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे.
रोजगार हमी योजनेमध्ये जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. कारण, राज्यातील सर्व विभागातील पाणीपातळी ४ते ७ मीटर घटल्याची नोंद आहे. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल.
यातूनच दुष्काळ या समस्येवर कायमचा शाश्वत उपाय सापडू शकेल, असे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.(वार्ताहर)