भूमिपूजनाला गेलो, नारळ फोडला अन् म्हणालो, कारखाना होणार नाही; शरद पवारांनी सांगितली 'ती' आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 03:56 PM2023-10-24T15:56:08+5:302023-10-24T15:57:03+5:30
दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पवार यांनी तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली.
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून आमदार रोहित पवार यांनी राज्यातील दौरे वाढवले आहेत. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पवार यांनी तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या सुरुवातील आज खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कचा किस्साही सांगितला.
प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा,असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा
खासदार शरद पवार म्हणाले, माझा एक छोटासा अनुभव सांगतो. पुण्यापासून २१ किलोमीटरवर एक साखर कारखाना होणार होता. त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला मला बोलावलं. तो कारखाना काढणारे गृहस्थ आमचे मित्र होते त्यांचं नाव नाना नवले ते कारखान्याचे चेअरमन होते. एकेकाळी महाराष्ट्र नाही तर देशाच्या सर्व विद्यापीठांमध्ये कुस्तीमध्ये एक नंबरचा पारितोषिक त्यांनी मिळवलेले. त्यांनी सहकारी कारखाना काढण्याचं ठरवलं. मला बोलावलं मी गेलो तिथे नारळ फोडला, कुदळ मारली, भाषणाला उभा राहिलो आणि सांगितलं की, इथे कारखाना होणार नाही.
"लोक बोलले अरे भूमीपूजनाला बोलावलं आणि सांगतात कारखाना होणार नाही, म्हटलं नाही होणार. तुम्हाला मी २० मैलावर जागा देतो तिथे कारखाना करा. मग इथे काय करायचं ? म्हटलं इथे मला आयटीचं केंद्र करायचंय, तिथे आयटीचं केंद्र काढलं, तुम्ही आज तिथे जाऊन बघा. आज त्या ठिकाणी एक प्रकारचा चमत्कार झालेला आहे, असंही शरद पवार म्हणाले.
"त्यावेळेला जमीन पाहिजे होती आयटी सेंटर काढायचं किंवा कुठलाही उद्योग काढायचा तर जमीन लागते. तर आता जमीन कुठून आणायची ? मला आठवलं की, आमच्या बरोबरचाच आमचा एक सहकारी होता, तो एमआयडीसीचा प्रमुख आहे. त्याचं नाव श्रीनिवास पाटील त्यांना सांगितलं आणि आठ दिवसांच्या आत काही हजार एकर जमीन एक्वायर करून ताब्यात दिली, म्हटलं करा काम सुरू. तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. हे उदाहरण यासाठी मी देतोय की, आज अशा प्रकारच्या उद्योगांची उभारणी करणं ही महाराष्ट्राची गरज आहे. त्यासाठी संघर्ष यात्रा आग्रह धरत असेल तर माझ्या मते सरकारला यावर निर्णय घ्यायला भाग पाडावेच लागेल, असंही पवार म्हणाले.
मी काही खोलात जाऊ इच्छित नाही , पण तुम्ही ज्या मागण्या केल्यात मग त्या कंत्राटी नोकर भरती असो, अवाजवी परीक्षा शुल्क असो, शाळा दत्तक योजना असो, समूह शाळा योजना असून, नोकर भरतीचा भ्रष्टाचार थांबवणं असो या सगळ्या निर्णयांबद्दल सरकारशी बोलावं लागेल. हवं असेल तर रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांना मी एक माहिती देऊ इच्छीतो की, तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या मागण्या तुम्ही एकत्रित करा व मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की, या तरुणांच्या मागण्यांसाठी बैठक बोलवा मी स्वतः त्या बैठकीला तुमच्याबरोबर हजर राहतो. त्यांना या मागण्यांची सनद आपण त्यांना देऊ आणि किती दिवसांत कोणता निर्णय तुम्ही घेता ? या संबंधीची स्वच्छ विचारणा त्यांना करू, त्यांनी काम आपलं केलं तर अभिनंदन करू नाही केलं तर काय करायचं ते ठरवू, असा सल्लाही शरद पवारांनी दिला.
"माझी खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री तुम्हा लोकांच्या प्रश्नांबद्दल गांभीर्याने बघतील आणि या प्रश्नांची सोडवणूक करतील एवढेच या ठिकाणी सांगतो. रोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे हा सबंध रस्त्याने जात असताना तिथल्या तरुणांच्या आत्मविश्वास तुम्ही वाढवाल आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलायला आज नवीन पिढी रस्त्यावर उतरलेली आहे हे दाखवाल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
आमदार श्री. रोहित पवार यांनी सुरुवात केलेल्या महाराष्ट्रातील तमाम युवकांना विश्वास आणि बळ देणाऱ्या ‘युवा संघर्ष यात्रा’ याला आजपासून पुण्यातून सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सर्व तरुण युवकांना मार्गदर्शन केले.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 24, 2023
सन्माननीय व्यासपीठ लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व उपस्थित मान्यवर… pic.twitter.com/unFC0JGEvQ