खडकी येथे भर रस्त्यावर पत्नीवर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 09:48 PM2019-12-31T21:48:39+5:302019-12-31T21:49:35+5:30
सहा वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली होती़. त्यांनी आळंदी येथे २०१५ मध्ये विवाह केला होता़.
पुणे: कौटुंबिक वादातून भररस्त्यावर पत्नीवर कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आले़. खडकीपोलिसांनी पतीला अटक केली आहे़. ही घटना खडकी बाजार येथील बिझनेस सेंटरमधील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली़ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.
प्रविण लक्ष्मण हांडे (रा़ कालेसोड, ता़ वेल्हे) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे़. याप्रकरणी प्रियदर्शनी एकनाथ ओव्हाळ (वय ३०, रा़ भाऊ पाटील रोड, दापोड) यांनी फिर्याद दिली आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडे आणि प्रियदर्शनी हे पतीपत्नी आहेत़. सहा वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली होती़. त्यांनी आळंदी येथे २०१५ मध्ये विवाह केला होता़. तेव्हापासून दोघेही हांडे याच्या मुळ गावी रहात होते़. मात्र, २०१७ मध्ये दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरुन वाद विवाद होऊ लागले़. तेव्हा प्रियदर्शनी या आईकडे बोपोडीत रहायला आल्या आहेत़. प्रविण हांडे हा वारंवार त्यांच्या घरी येऊन सोबत राहण्यास येण्याविषयी सांगत होता़ त्यावरुन त्यांच्याशी भांडण होता़.
प्रियदर्शनी, तिची आई व बहिण असे तिघी जणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आईची पेन्शन काढण्यासाठी आल्या होत्या़. बँकेत गर्दी असल्याने आत आई रांगेत उभी होती़. त्या बहिणीबरोबर बाहेर बोलत उभ्या होत्या़. त्यावेळी प्रविणही तेथे आला़. त्याने आपल्या पत्नीला तु माझ्या सोबत का आली नाही, असे म्हणून त्याने तिच्या डोक्यात कोयत्याने वार केला़. ती जागेवरच कोसळली़. त्यानंतरही त्याने थांब आता तुला संपवूनच टाकतो, असे म्हणून त्याने प्रियदर्शनी हिच्या मानेवर पुन्हा वार केला़. प्रवीण हांडे हा कार्ले येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो़ खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत़.