आम्ही नदीकाठापासून दूर
By Admin | Published: February 5, 2016 02:22 AM2016-02-05T02:22:32+5:302016-02-05T02:22:32+5:30
‘तुमची मिळकत पूररेषेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे,’ अशा स्पष्ट शब्दांतील महापालिकेच्या नोटिशीने धास्तावलेल्या साडेचारशेपेक्षा जास्त
पुणे : ‘तुमची मिळकत पूररेषेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे,’ अशा स्पष्ट शब्दांतील महापालिकेच्या नोटिशीने धास्तावलेल्या साडेचारशेपेक्षा जास्त कुटुंबांनी आम्ही नदीपात्रातील नाही तर नदीकाठापासून बरेच लांब असलेले रहिवासी असल्याचा दावा केला आहे. हरित न्यायाधिकरणाच्या निकालाला अनुसरून पालिका आपल्याकडे करीत असलेली विचारणाच मुळात चुकीची असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
पूररेषा कुठे आहे, हे पाहून महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीनंतरच आम्ही घरे घेतली असून, आता आम्ही पूररेषेत आहोत, असे आढळत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मग त्या वेळी परवानगी दिली ती कोणत्या पूररेषेच्या आधारे? असा प्रश्न या रहिवाशांकडून केला जात आहे. या परिसरातल्या फक्त एकतानगरमधील १६ इमारती व त्यातील ४५० सदनिकाधारकांना पालिकेच्या बांधकाम विकास विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय अन्य काही सोसायट्याही यात आहेत. त्यातील अनेकांचे घराचे कर्जही अद्याप फिटलेले नाही. पालिकेच्या या नोटिशीने व नदीपात्रात असलेला रस्ता उखडून टाकण्याच्या न्यायालयीन निर्णयामुुळे आपल्या घरांवरही हातोडा पडतो की काय, अशा धास्तीने काहींनी आपल्या घराची सुरू असलेली दुरूस्तीही थांबवली आहे. संगम सहकारी गृहरचना सोसायटी, जलपूजन सहकारी गृहरचना संस्था, शारदा सरोवर सोसायटी, राज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, आनंद पार्क सोसायटी, द्वारका इमारत, कुदळे पाटील गार्डन, राधाकृष्ण विहार, गायत्री अपार्टमेंट अशा अनेक सोसायट्यांमधील सदनिकाधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. आता ८ फेब्रुवारीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासमवेत बैठक होणार आहे.