पश्चिम रेल्वेच्या सेवेत‘मेधा’
By admin | Published: March 16, 2017 04:01 AM2017-03-16T04:01:37+5:302017-03-16T04:01:37+5:30
नवीन बम्बार्डियर कंपनीच्या लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या असतानाच, आता भारतीय बनावटीची ‘मेधा’लोकलही
मुंबई : नवीन बम्बार्डियर कंपनीच्या लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या असतानाच, आता भारतीय बनावटीची ‘मेधा’लोकलही पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अनेक नवीन सुविधांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन मेधा लोकललाही हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. सध्या मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर धावत असलेल्या सीमेन्स व बम्बार्डियर
या परदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड
ही लोकल बनवण्यात आल्याचा
दावा रेल्वेकडून करण्यात आला
आहे.
मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या सीमेन्स, तसेच बम्बार्डियर कंपनीच्या लोकल धावतात. या लोकलची अंतर्गत इलेक्ट्रिकल व अन्य तांत्रिक कामे ही सीमेन्स व बम्बार्डियर कंपनीची आहेत. मात्र, संपूर्णपणे देशी बनावटीची असलेली लोकलची अंतर्गत इलेक्ट्रिकल यंत्रणा व अन्य तांत्रिक कामे ही मेक इन इंडिया अंतर्गत पहिल्यांदाच हैद्राबाद येथील ‘मेधा सर्वो ड्राइव्ह’या भारतीय कंपनीने केली आहे. त्यावरूनच या लोकलला ‘मेधा’हे नाव देण्यात आले. चेन्नईतील रेल्वेच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये मेधा लोकलचे काम पूर्ण करण्यात आले. मेधा लोकल दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर दाखल झाली होती. त्यानंतर, या लोकलच्या चाचण्या घेण्यास आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांचीही मंजुरी मिळण्यास बराच वेळ गेला.
अखेर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या लोकला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मेधा लोकलची किंमत ही सीमेन्स व बम्बार्डियर लोकलपेक्षाही कमी आहे. बारा डब्यांच्या एका बम्बार्डियर लोकलची किंमत ही ४४ कोटी ३६ लाख एवढी आहे, तर एका मेधा लोकलची किंमत ४३ कोटी रुपये आहे. आतापर्यंत रेल्वेकडून दोन गाड्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली. (प्रतिनिधी)