आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट, ग्रामपंचायतींना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:08 AM2021-04-17T04:08:57+5:302021-04-17T04:08:57+5:30
पश्चिम भागामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी प्रशासनाने अत्यंत कडक पध्दतीने अंमलबजावणी केल्याने कोणताही प्रभाव आढळत नव्हता. परंतु दुसऱ्या लाटेत ...
पश्चिम भागामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी प्रशासनाने अत्यंत कडक पध्दतीने अंमलबजावणी केल्याने कोणताही प्रभाव आढळत नव्हता. परंतु दुसऱ्या लाटेत मात्र स्थानिक आदिवासी भाग हा अपवाद न राहता कोरोनाने प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. सध्या आदिवासी भागातील प्रशासक असणारे ग्रामसेवक व तलाठी हे आठवड्यातील एक वेळा येतात तर बहुतेक ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. गतवर्षी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व ग्रामसेवकांना कोरोनाकाळात मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले होते. परंतु ह्या आदेशाला आदिवासी भागात ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली. याबाबतच्या अनेक तक्रारी स्थानिक स्तरावरुन झाल्या, परंतु वरिष्ठ अधिकारी या ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचे चित्र् पाहावयास मिळत आहे.
पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी पश्चिम आदिवासी भागात वाढत असलेल्या कोरोनाची दक्षता घेण्यासाठी अचानक पाहणी केली असता आदिवासी भागातील अनेक ग्रामपंचायतींना भेट दिल्या. असता ग्रामपंचायतींना अक्षरश: टाळे पाहावयास मिळाले. यामध्ये राजपूर, जांभोरी, पाटण, कुशिरे, असाणे, पंचाळे, फलोदे, डिंभे, चपटेवाडी, पिंपळगाव तर्फे घोडा आदी ग्रामपंचायती बंद होत्या.
कोरोनाकाळात वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांमधून उपाययोजना करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज दहा ते पाच करण्याचे सूचना दिल्या असताना व मुख्यालयी राहाणे बंधनकारक असतानाही बहुतेक ग्रामसेवक हे वेळेत उपस्थित राहत नसल्याचे व निवासी नसल्याबाबतचे पंचायत समिती सभापती गवारी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. _________________________________ "पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी ग्रामसेवक तलाठी यांनी सजेच्या ठिकाणी थांबून नियोजन करणे गरजेचे आहे. जे कर्मचारी व ग्रामसेवक कोरोनाकाळात कामकाजात व कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा करतील, त्यांचा अहवाल तातडीने गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवायचा आहे.अशा लेखी स्वरुपाचे पञ राज्याचे गृहमंञी दिलीप वळसे पाटील व गटविकास अधिकारी यांना दिले आहे."
संजय गवारी
पंचायत समिती सभापती आंबेगाव
संबंधित ग्रामसेवकांना नोटीस देऊन खुलासा मागविणार व खुलासा समाधानकारक नसेल तर व ग्रामपंचायतीमध्ये गैरहजर असल्याची तक्रार आल्यास त्या ग्रामसेवकांचे प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना पाठवून योग्य कारवाई करण्याची मागणी यात केली जाणार आहे"
जालिंदर पठारे
गटविकास अधिकारी आंबेगाव
कोरोनाच्या अत्यंत कठीन काळामध्ये तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील ग्रामपंचायतीना टाळे दिसुन येत आहेत.