VIDEO: बारामतीच्या जागेचे काय? अन् शेलार म्हणाले, सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:28 AM2024-04-20T11:28:49+5:302024-04-20T11:30:46+5:30
पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता...
पुणे : पुण्यात पत्रकारांशी बाेलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी बारामती लाेकसभा मतदारसंघाबाबत धक्कादायक विधान केले. बारामतीच्या जागेचे काय? या पत्रकारांच्या प्रश्नावर शेलार यांनी चुकून सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार, असे बोलून गेले. पण चूक लक्षात येताच सुनेत्रा पवार या जिंकणार आहेत, असे म्हणत सारवासारव केली.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यापूर्वी शेलार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर उपस्थित होते.
शेलार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चर्चा करून जिंकून येण्याच्या निकषावर जागा वाटप केले आहे. आम्ही कोणाच्याही जागा कमी करत नाही. लोकसभेची निवडणूक देशाची असल्याने ती पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होत आहे.
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आमचे जुने व्हिडीओ लावले होते; पण उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्याबद्दल काय बोलले हे जुने व्हिडीओ काढून पाहा, असेही शेलार म्हणाले. मतदानासाठी धमक्या दिल्या जात आहेत, असे म्हणणे योग्य नाही. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्याने ते अशी वक्तव्य करून त्यांच्या पराभवाच्या कारणांची पार्श्वभूमी तयार करत आहेत.
बारामतीच्या जागेचे काय? अन् शेलार म्हणाले, सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार...#ashishshelar#punepic.twitter.com/Cbr9aceVCr
— Lokmat (@lokmat) April 20, 2024
महायुतीत राजकीय ॲडजेस्टमेंट - उदय सामंत
महायुतीमध्ये राजकीय ॲडजेस्टमेंट आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक नव्हते; मग ते आता का तयार झाले यावर आता चर्चा करून उपयोग नाही, त्यांनी अर्ज भरला आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.