PMC Election | पुण्यात भाजपा मनसे युतीचे काय, होणार की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:50 PM2022-05-04T19:50:45+5:302022-05-04T20:14:03+5:30
येणाऱ्या महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्र येणार का?
- राजू इनामदार
पुणे : भोंगा व महाआरतीच्या भूमिकेनंतर राजकारणाच्या पटावर एकदम पुढे आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भारतीय जनता पार्टीबरोबर युती होणार की नाही याची चर्चा आधीच सुरू होती, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूकीसंबधीच्या आदेशानंतर या चर्चेला चांगलाच जोर आला आहे.
ही युती झाली तर काय-काय होऊ शकते याचे आडाखे विरोधातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून मांडले जात आहेत. महापालिका निवडणूकांची दोन महिन्यांपूर्वी चर्चा सुरू झाली त्यावेळी मनसे राजकीय दृष्ट्या एकदम पिछाडीवर होती. त्यांचा कोणी विचारही करत नव्हते. खुद्द त्या पक्षाचे स्थानिक नेतेही संभ्रमात होते. मात्र आता राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलल्यानंतर मात्र मनसे चर्चेत आली आहे. त्यातच राज ठाकरे यांना मसनसेकडून हिंदूजननायक म्हणून जाहीरपणे पुढे आणले जात आहे. त्यामुळेच चर्चेला जोर आला आहे.
शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करून राज्यात सत्ता मिळवल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या अनुषंगाने शिवसेनेला वारंवार कोंडीत पकडणे सुरू ठेवले. मात्र ते एकटेच पडले होते. त्यांना आता मनसेचे बळ मिळाले आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत मनसे व भाजपा यांची युती होईल का या चर्चेने जोर पकडला आहे. मनसैनिकांकडून याचा निर्णय राज ठाकरे घेतील असे सांगण्यात येते तर भाजपातही वरिष्ठ स्तरावरच यासंबधी निर्णय होईल असे बोलले जाते. मात्र दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा ही युती व्हावी अशीच असल्याचे दिसते आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे नेते युती झाली तरी काही फरक पडत नाही असे सांगत असले तरी त्यांच्यातही या दोन्ही पक्षांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला कसे सामोरे जायचे, त्याचा प्रतिवाद कसा करायचा यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की यामुळे विशेष राजकीय फरक पडेल असे वाटत नाही. हिंदुत्वाचा मुद्दा कितीही ताणला तरीही या दोन्ही पक्षांना अखेर व विकासाच्या मुद्द्यावरच यावे लागले असे मत जगताप व जोशी यांनी व्यक्त केले.