जातीधर्माने खच्ची झालेले असताना आत्मनिर्भरता कसली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:13+5:302021-02-14T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “जातीधर्माने माणसांचे जीवन खच्ची होत असताना पंतप्रधान कसली आत्मनिर्भरता म्हणतात, त्यांनाच माहीत! अशा परिस्थितीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “जातीधर्माने माणसांचे जीवन खच्ची होत असताना पंतप्रधान कसली आत्मनिर्भरता म्हणतात, त्यांनाच माहीत! अशा परिस्थितीत माणूस उभा तरी कसा राहणार,” असा सवाल कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला.
सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.१३) सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात डॉ. आढाव यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आढाव बोलत होते. गजानन खातू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुभाष वारे यावेळी उपस्थित होते. डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार शामसुंदर सोन्नर (परळी), एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार वर्षा विद्या विलास (मुंबई) व सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पौर्णिमा मेहेर (पालघर) यांना देण्यात आला.
डॉ. आढाव यांनी वाढत्या सामाजिक विषमतेबद्दल खंत व्यक्त केली. जगात असा एकही देश नाही? जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही चुकत नाही. ते त्यांच्या तत्त्वानुसार वागतात. राममंदिरासाठी घरोघर फिरतात, आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी असे फिरणार आहोत की नाही? फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत राहू नका, तर सक्रिय व्हा, तळातील लोकांबरोबर, त्यांच्या भाषेत बोला. संवाद साधण्याचे तंत्र आत्मसात करा, असे आढाव म्हणाले.
खातू म्हणाले, “पाणी खराब झाले आहे, मात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे ते स्वच्छ होते, नव्या पिढीने आता आपणच आपले नेतृत्व करायला शिकावे” सर्व पुरस्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या कामाची माहिती देणाऱ्या मानपत्राचे लेखन सुभाष वारे यांनी केले. त्याचे वाचन इब्राहीम खान, ओंकार मोरे व पौर्णिमा यांनी केले. महात्मा फुले यांच्या अखंड गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जाकीर अत्तार यांनी सूत्रसंचालन केले.