बारावी परीक्षेला पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:05+5:302021-05-27T04:11:05+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा ...

What is the alternative to 12th exam? | बारावी परीक्षेला पर्याय काय?

बारावी परीक्षेला पर्याय काय?

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करणे शक्य नसल्यामुळे त्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र, परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३० हजार ९८३ एवढी आहे. पुणे विभागातून पुणे, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात १ लाख २६ हजार ६०६ मुलांचा १ लाख ४ हजार ३३७ मुलींचा समावेश आहे.

शिक्षणतज्ज्ञांकडून परीक्षेबाबत वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत. तर विद्यार्थ्यांनीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने आणि कमी गुणांची परीक्षा घेऊन आम्हाला तणावातून दूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

--------

ऑफलाइन पर्याय स्वीकारला तर प्रश्नांची संख्या कमी करून परीक्षेची वेळ कमी करावी. विज्ञान शाखेचा प्रायोगिक भाग परीक्षेतून वगळावा. केवळ थेअरीवर परीक्षा घ्यावी. परीक्षा टाळायचीच असेल तर विद्यार्थ्यांनी कृतीसंशोधन प्रकल्प सादर करावा व शिक्षकांनी त्यावर त्यांची ऑनलाइन तोंडी परीक्षा घ्यावी. दहावी व अकरावीच्या गुणांवर इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा.

- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

----------

कमी गुणांची सर्व विषयांवरील प्रश्नांची एकच परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडून इयत्ता बारावीबाबत घेतली जाणारी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नीट, जेईई यासारख्या परीक्षा इयत्ता बारावीनंतर घेतल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून घेतल्या जाणा-या निर्णयाकडे लक्ष देऊन त्याच्याशी सुसंगत निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

--------

इयत्ता बारावीची परीक्षा घेणे आवश्यक आहे. ती कोणत्या पद्धतीने घ्यावी याचा विचार राज्य मंडळाने करावा. परंतु, इयत्ता बारावीच्या गुणांवर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही. त्यासाठी स्वतंत्र प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून बारावीची परीक्षा घेता येईल.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

----------

परीक्षेला खूप उशीर झाला आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती पुढील एक महिनाभर राहिली तर शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेसारखी एकच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा.

- ओम ‌नवले, विद्यार्थी, इयत्ता बारावी, स. प. महाविद्यालय

-----

शासनाकडून परीक्षांबाबत पर्यायांचा विचार केला जात आहे. ऑनलाइन परीक्षा घेतल्या तर सर्वच विषयांची परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य होईल. मात्र, ऑफलाईन परीक्षा घ्यायचे ठरले तर काही निवडक विषयांची परीक्षा घ्यावी.

- ईश्वरी पाटील, विद्यार्थी, इयत्ता बारावी, मुक्तांगण,

----

ऑनलाइन परीक्षेच्या पर्यायाचा विचार करावा. ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर काही निवडक विषयांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घ्यावी. मात्र सलग तीन तास विद्यार्थी मास्क लावून एका ठिकाणी बसू शकत नाही. त्यामुळे ५० गुणांची परीक्षा असावी.

- तन्वी पवार, विद्यार्थी, इयत्ता बारावी, स. प. महाविद्यालय

Web Title: What is the alternative to 12th exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.