मेक इन इंडियाचा स्थानिकांना काय फायदा? योजना उद्योगपतींसाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:31 AM2018-05-11T02:31:11+5:302018-05-11T02:31:11+5:30
सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे.
कुरुळी - सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, सोसायटीची माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे यांनी केली आहे.
खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी, एसीझेड परिसर मोठया प्रमाणात वाढत चालल आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगांची या परिसरात मोठी गुंतवणूकष होत आहे. मात्र, प्रकल्प उभा करण्यासाठी ज्या शेतक-यांनी जमिनी दिल्या त्यापैकी अनेक शेतक-यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. तर, दुसरीकडे भुमीपुत्रांना नोक-यांमध्ये संधीच अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. या परिसराती शेतक-यांच्या शेती ची जमीन उद्योगांसाठी सरकारने संपादित केल्या. मोबदल्यासाठी स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपला विरोध सरकार पुढे मांडला.कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यात आल्या. हळूहळू उद्योगही या परिसरात उभे राहू लागले. हे सर्व करीत असताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी झाली. पण काही काळात बाहेरच्या राज्यातून या परिसरात कंपनीच्या उच्चपदवर अधिका-यांची भरती करण्यात आली. या अधिका-यांनी कंत्राट पद्धतीने सुरु करून परराज्यातील तरुणाना नोक-यांमध्ये समाविष्ट करून घेतले.
जगाच्या नकाशावर असणा-या चाकण एमआयडीसीत प्रकल्पात मोठया झपाट्याने वाढ होत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरी पासून वंचित राहवे लागते आहे. याच उद्योगामध्ये परराज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने कमी मोबदलात रोजगार दिला जातो. मेक इन इंडियाच्या माध्यमातून परिसरातील मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय उद्योगांनी गुंतवणूक केली.या गावांमधील स्थानिक तरुण मात्र बेरोजगारीलाच सामोरे जात आहेत.
प्रकल्पबाधित स्थानिक तरुणांना येथील कंपनीत साधा प्रवेशही मिळत नाही. तरुण पिढी शैक्षणिक पात्रता असूनही बेरोजगार बनत चालली आहे. परराज्यातील तरुणांना नोकरी देत त्यांच्या कडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदलाही योग्य पद्धतीने दिला जात नाही. शेतकरी दिवसभर शेतात काम करून मोल मजुरी करून पोटाला चिमटा घेत मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. उच्चशिक्षत तरुणांना दिवस भरत पडेल ते काम करावे लागते. वाढती महागाई पाहता कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आता तरुणांना पुढे आ वासून उभा आहे.